पाकिस्तानात मोठ्या घडामोडी! इम्रान खान यांच्या बहिणीला थेट अटक, पोलिसांची तडकाफडकी कारवाई

पोलिसांनी गेस्ट हाऊस, बस टर्मिनल आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी देखरेख वाढवली आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अन्न, पाणी, वाहतूक किंवा निवासाची व्यवस्था करणाऱ्यांवरही नजर ठेवली जात आहे.

पाकिस्तानात मोठ्या घडामोडी! इम्रान खान यांच्या बहिणीला थेट अटक, पोलिसांची तडकाफडकी कारवाई
pakistan imran khan and aleema khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 20, 2026 | 5:16 PM

Imran Khan Sister Arrest : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे संस्थापक इमरान खान यांची बहीण अलीमा खान यांना पोलिसांनी लाहोरमधील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, PTIच्या प्रवक्त्याने अलीमा खान यांच्या अटकेची माहिती दिली. 27 सप्टेंबर रोजी पक्षाकडून मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे इम्रान खान हे 2023 सालापासून तुरुंगात आहेत. असे असताना आता त्यांच्या बहिणीवरही अटकेची कारवाई करण्यात आल्याने पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.

इम्रान खान यांच्या बहिणीवर अटकेची कारवाई

इमरान खान यांची तुरुंगातून सुटका करावी, या मागणीसाठी PTI देशभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. इमरान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेची मागणी हीच सध्या पक्षाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. दरम्यान, 27 सप्टेंबर रोजी देशभरात हे आंदोलन होणार आहे. त्याआधीच अनेक PTI कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीही पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या या कारवाईनंतर सरकार आंदोलन कमकुवत करण्यासाठी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप PTIकडून करण्यात आला आहे.

इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक

संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, सेंट्रल पोलीस ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाची बैठक झाली. आंदोलनादरम्यान हिंसाचार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षा आराखड्याचा आढावा घेण्यात आला.

पोलिसांकडून काय तयारी केली जातेय?

पोलिसांनी गेस्ट हाऊस, बस टर्मिनल आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी देखरेख वाढवली आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अन्न, पाणी, वाहतूक किंवा निवासाची व्यवस्था करणाऱ्यांवरही नजर ठेवली जात आहे. स्पेशल ब्रांच आणि काउंटर टेररिझम विभागासह विविध सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

पीटीआय पक्ष आणखी सक्रिय होण्याची शक्यता

दुसरीकडे PTIने आपल्या कार्यकर्त्यांना देशभरातून इस्लामाबादमध्ये पोहोचण्याचे आवाहन केले आहे. अलीमा खान यांच्या अटकेनंतर पक्षाची भूमिका आणखी आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानातील राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीकडे लक्ष लागले आहे.  त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us