पाकिस्तान 360 भारतीय कैद्यांना सोडणार, मराठी मच्छिमारांचाही समावेश

पाकिस्तान 360 भारतीय कैद्यांना सोडणार, मराठी मच्छिमारांचाही समावेश

इस्लामाबाद : पाकिस्तानकडून या महिन्यात 360 भारतीय कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिक आणि मच्छिमारांचा समावेश आहे. चार टप्प्यात या कैद्यांना सोडलं जाईल. ज्यापैकी 100 कैदी या रविवारी वाघा बॉर्डरवर आणले जातील आणि त्यांना सोमवारी कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं जाईल. याचप्रमाणे 14, 21 आणि 28 एप्रिलला इतरांची सुटका होणार आहे. प्रत्येक टप्प्यात 100 भारतीय येणार असून शेवटच्या टप्प्यात 60 भारतीय येतील.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायुक्तालयाला 385 भारतीय मच्छिमारांना सोडण्याची मागणी केली होती. यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे. समुद्रात चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानंतर या मासेमारांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या जेलमध्ये सध्या 385 मासेमार आहेत. या महिन्यात सोडण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये मराठी आणि गुजराती नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

शेवटच्या टप्प्यात 60 कैद्यांना सोडलं जाईल. जाणकारांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात कैद्यांना सोडणं हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं यश मानलं जात आहे. यापूर्वी सप्टेंबर 2010 मध्ये 442 मासेमारांची सुटका करण्यात आली होती. चुकून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारतीय नागरिकांना अटक केली जाते. त्यांच्यावर खटलेही चालवले जातात आणि छळ केला जातो. पण यावर तीव्र आक्षेप घेत केंद्र सरकारने भारतीय नागरिकांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली होती.

भारतीय कैद्यांच्या बदल्यात पाकिस्तानी कैद्यांचीही भारताकडून सुटका केली जाईल का याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. पाकिस्तान उच्चायुक्ताच्या मते, भारतीय जेलमध्ये पाकिस्तानचे 50 कैदी असे आहेत, ज्यांनी शिक्षा पूर्ण केली आहे, पण कागदोपत्री कार्यवाहीमुळे ते सध्या अडकून आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना ही सुटका होणं महत्त्वाचं मानलं जात आहे. पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद्यांची कशी अवस्था होते याबाबत जागतिक स्तरावरही टीका करण्यात आलेली आहे. याचीच दखल घेत भारतानेही आमच्या नागरिकांना तातडीने सोडण्यात यावं, ही मागणी केली होती.

पाकिस्तानच्या जेलमध्ये भारताचे 15 नागरिक आणि 385 मासेमार असे आहेत, ज्यांनी शिक्षा पूर्ण केली आहे. पण तरीही पाकिस्तानकडून सुटका केली जात नव्हती. पाकिस्तानच्या जेलमध्ये असलेल्या भारतीय कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी भारताच्या डॉक्टरांना लवकरात लवकर व्हिसा द्यावा, अशीही मागणी भारताने केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *