
आंतरराष्ट्रीय राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या गाझा शांती प्रस्तावपासून पाकिस्तानने स्वत:ला अलिप्त ठेवलं आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत बोलताना पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक डार यांनी मंगळवारी मोठं वक्तव्य केलं आहे. अमेरिकेकडून तयार करण्यात आलेली ही योजना आठ मुस्लिम देशांचे जे प्रस्तावित पॉइंटस आहेत, त्यापेक्षा वेगळी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या शांती प्रस्तावामध्ये युद्धविराम, माणुसकीच्या दृष्टीकोनातून मदत आणि जबरदस्तीनं घडून आणण्यात येत असलेलं स्थलांतर थांबवणे या सारख्या मुद्द्यांचा समावेश नसल्यामुळे पाकिस्तान अमेरिकेच्या या प्रस्तावाचं समर्थन करू शकत नसल्याचं देखील डार यांनी म्हटलं आहे.
हा आमचा प्रस्ताव नसल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर आणि ट्रम्प व नेतन्याहू यांच्या व्हाईट हाऊसमधील बैठकीच्या काही तास अगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या प्रस्तावाचं स्वागत केलं होतं. मी डोनाल्ड ट्रम्प यांनी जो वीस पॉइंटचा प्रस्ताव सादर केला आहे, त्याचं स्वागत करतो, ज्याचा उद्देश हा गाझामधील युद्ध संपवण्याचा आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये या प्रस्तावासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पाकिस्तान या प्रस्तावाचं शंभर टक्के स्वागत करेल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र जसा हा प्रस्ताव सर्वांसमोर आला, तसं पाकिस्तानने या प्रस्तावापासून स्वत:ला अलिप्त ठेवलं आहे. या प्रस्तावामधील जे मुद्दे आहेत, ते आठ मुस्लिम राष्ट्रांच्या मुद्द्यांपेक्षा वेगळे आहेत, त्यामुळे आम्ही या प्रस्तावाचं समर्थन करू शकत नाही, असं पाकिस्तानने म्हटलं आहे. यामध्ये गाझामध्ये युद्धविराम आणि जबरदस्तीनं सुरू असलेलं स्थलांतर थांबवण्याचा मुद्दाच नसल्याचा दावा देखील डार यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर डोनाल्ड ट्रम्प काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.