
पीएम मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याने भारत-अमेरिकेची मैत्री अधिक दृढ झाली आहे. संरक्षण, ऊर्जा, व्यापार, AI आणि अप्रवासी भारतीयांच्या मुद्यांवर या दौऱ्यात चर्चा झाली. याचवेळी पाकिस्तानने टर्कीसोबत मिळून द्विपक्षीय व्यापार 5 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा करार केला आहे. मूळात टर्की या देशाने मागच्या काही वर्षात भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला साथ दिली आहे. काश्मीर मुद्यावर टर्कीने नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे.
टर्कीचे राष्ट्रपती दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी 12 फेब्रुवारीला इस्लामाबादला पोहोचले होते. रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी त्यांचं स्वागत केलं. पाकिस्तानच्या स्थानिक रेडिओनुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ते इस्लामाबादल पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांचे जोरदार गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आलं. यावेळी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवण्यात आलं.
पाकिस्तानसोबत किती करार?
एका उच्च स्तरीय बैठकीत टर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन म्हणाले की, “दोन्ही देश पहिल्या टप्प्यात सध्याच्या व्यापार कराराचा विस्तार करण्यावर विचार करत आहेत” रेडिओ पाकिस्तानने ही माहिती दिली. बैठकीनंतर एर्दोगन मीडियाशी बोलताना म्हणाले की, “टर्की आपल्या गुंतवणूकदारांना पाकिस्तानात अधिक गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित करेल. संरक्षण क्षेत्रात आमचं सहकार्य वाढलं आहे” पाकिस्तान सोबत केलेले 24 करार दोन्ही देशाच्या फायद्याचे ठरतील अशी अपेक्षा टर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांनी व्यक्त केली.
वास्तविक लक्ष्य गाठणार का?
इस्लामाबादमध्ये पाकिस्तान-टर्की व्यापार फोरमला संबोधित करताना शहबाज शरीफ म्हणाले की, “दोन्ही देशांनी 5 बिलियन डॉलरचा द्विपक्षीय व्यापार सुनिश्चित करण्याचा संकल्प केला आहे. आम्ही निश्चितपणे 5 बिलियन डॉलरच लक्ष्य गाठू. यासाठी अजून बरच काम बाकी आहे. आज आम्ही अनेक सहमती पत्र आणि करारांवर स्वाक्षरी केल्या. कागदोपत्री करार पूर्ण झालेत. पण वास्तविक लक्ष्य गाठणं हे सर्वात जास्त महत्त्वाच आहे”