
रशिया आणि अमेरिका हे जगातील दोन शक्तीशाली देश आहेत. अनेक दशकापासून हे दोन्ही देश भारताचे रणनितीक भागीदार राहिले आहेत. अमेरिकेने सुरु केलेलं टॅरिफ वॉर आणि वेगात बदलणाऱ्या जागतिक परिस्थिती, या पार्श्वभूमीवर दोन्ही सुपरपॉवरसाठी पीएम मोदी इतके महत्त्वाचे का आहेत?. हा प्रश्न यासाठी निर्माण होतोय कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75 व्या जन्मदिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही देशांचे नेते इतके उत्सुक का होते?.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पीएम मोदींना थेट नरेंद्र म्हटलं.ते माझे मित्र आहेत, असं ट्रम्प म्हणाले. तेच रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पीएम मोदींच्या योगदानाच कौतुक केलं.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात दुरावा निर्माण झालाय. ट्रम्प यांनी पीएम मोदींच्या बर्थ डे च्या निमित्ताने शुभेच्छा देऊन हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात लिहिलं की, “आताच माझं माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवर शानदार बोलणं झालं. मी त्यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या. ते शानदार काम करत आहेत”
पुतिन मोदींबद्दल काय म्हणाले?
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पीएम मोदींच कौतुक करताना लिहिलं की, द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांच कौतुक केलं. शासनाचे प्रमुख म्हणून काम करताना तुम्ही देशवासियांमध्ये एक वेगळा सन्मान मिळवलाय. जागतिक मंचावर याचा प्रभाव दिसतो. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक आणि टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलं आहे असं पुतिन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलय.
रशियासाठी भारत इतका महत्वाचा का?
रशियाकडून तेल खरेदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. रशियासोबत भारताची मैत्री जुनी आणि विश्वासार्ह आहे. रशिया आणि भारत यांच्यात संरक्षणासह ऊर्जा पुरवठ्याचे अनेक करार झाले आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटनुसार, वर्ष 2019 ते 2023 दरम्यान भारताने रशियाकडून 36 टक्के शस्त्र आयात केली. व्यापार मंत्रालयाच्या आकड्यांनुसार भारताने 2024-25 मध्ये तेल आयातीच्या एकूण 35 टक्के हिस्सा रशियाकडून मागवला आहे. युक्रेन युद्धानंतर रशियावर अनेक प्रतिबंध लावण्यात आले. त्यानंतर रशियाने भारताला सर्वात जास्त तेल विक्री केली.
अमेरिकेला भारत का हवा?
भारत अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. वर्ष 2024-25 मध्ये दोन्ही देशांमध्ये जवळपास 131.84 बिलियन डॉलरचा व्यापार झाला. त्याशिवाय उच्च तंत्रज्ञानाची शस्त्र सुद्धा भारत अमेरिकेकडून विकत घेतो. भारत दरवर्षी अमेरिकेसोबत 41 बिलियन डॉलरचा व्यापार करतो. दोन्ही देशांमध्ये ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा मिळून एकूण निर्यात 69.16 अब्ज डॉलर होती. आयात 79.04 अब्ज डॉलर्सच्या आसपास होती. चालू आर्थिक वर्षात पहिल्या पाच महिन्यात एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पेट्रोलियम उत्पादने 13.26 अब्ज डॉलर, कोळसा आणि कोक 2 अब्ज डॉलर, इलेक्ट्रॉनिक सामान (9.73 अब्ज डॉलर), रसायन (2.49 अब्ज डॉलर), वनस्पती तेल (2 अब्ज डॉलर) व्यापार झाला.
दोन्ही देशांसाठी भारतासोबत संतुलन ठेवणं आवश्यक
आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत कधीच कुठल्या सैन्य किंवा राजकीय गटाचा हिस्सा राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने नेहमीच स्वतंत्र आणि निष्पक्ष भूमिका घेतली आहे. अशावेळी दोन्ही शक्तीशाली देशांना भारतासोबत संतुलन बनवून ठेवायचं आहे. भारतासाठी अमेरिका आणि रशिया महत्वाचे आहेत, तर रशिया आणि अमेरिका सुद्धा भारताशिवाय पुढे जाऊ शकत नाही. चीनच दोन्ही देशांसमोर आव्हान आहे.