PM Narendra Modi : मोदींना मानलं, युरोप दौऱ्यात स्लोवाकिया सारख्या छोट्या देशात सुद्धा ते जाणार, कारणही तितकचं खास
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून युरोप दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात मोदी स्लोवाकिया मध्ये सुद्धा जाणार आहेत. स्लोवाकिया युरोपमधला एक छोटासा देश आहे. मोदी तिथे का जाणार? हा प्रश्न काहींना पडू शकतो. पण दौरा भारतासाठी खूप महत्वाचा असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या शनिवारपासून पाच दिवसीय युरोप दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात मोदी फ्रान्ससह स्लोवाकियाला भेट देणार आहेत. स्लोवाकिया युरोपमधला एक छोटासा देश आहे. मोदी स्लोवाकियाला का जाणार ? हा अनेकांना प्रश्न पडू शकतो. पण मोदींच्या टूर मध्ये स्लोवाकियाचा दौरा खूप महत्वाचा आहे. कुठल्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला द्विपक्षीय दौरा आहे. युरोप मधल्या इतक्या छोट्या देशात भारताला इतका रस का आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 ते 18 जून असे पाच दिवस युरोप दौऱ्यावर आहेत.
स्लोवाकिया लोकसंख्या 55 लाख आहे. पण युरोपच्या अर्थव्यवस्थेमध्ये या देशाची भूमिका त्यांच्या आकारमानापेक्षा खूप मोठी आहे. जगातील प्रमुख ऑटोमोबाइल विनिर्माण केंद्रांमध्ये या देशाचा समावेश होतो. प्रति व्यक्ती कार उत्पादनाच्या बाबतीत बऱ्याच काळापासून स्लोवाकियाचा आघाडीच्या देशांमध्ये समावेश होतो. अनेक विख्यात जागतिक वाहन उत्पादन कंपन्यांचे प्रकल्प या देशांमध्ये आहेत.
स्लोवाकियाची भारताला कशाच्या बाबतीत मदत होईल?
भारत आपली उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याचं उद्दिष्टय आहे. युरोप सोबतच्या आर्थिक संबंधांना नवीन गती देण्याचा प्रयत्न करत आहे. ऑटोमोबाइल, इंजीनियरिंग आणि अत्याधुनिक विनिर्माण सारख्या क्षेत्रात भारताला स्लोवाकियाची मोठी मदत होऊ शकते. दोन्ही देश जवळ येण्यामागचं हे सुद्धा एक कारण आहे.
स्लोवाकियाचा दौरा त्याच रणनितीचा भाग
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युरोप दौरा फक्त व्यापारपुरता मर्यादीत नाही. मागच्या काही वर्षात भारताने युरोप सोबतचे आपले संबंध पारंपारिक भागिदारीपेक्षा अधिक वाढवले आहेत. फ्रान्स, जर्मनी आणि इटली शिवाय भारताने मध्य आणि पूर्व युरोपातील देशांसोबत भागीदारी वाढवण्यावर भर दिला आहे. स्लोवाकियाचा दौरा त्याच रणनितीचा भाग आहे.
भारताची रणनिती काय?
स्लोवाकिया युरोपियन यूनियन आणि नाटोचा सदस्य आहे. त्यांच्यासोबत भक्कम संबंधामुळे भारताला मध्य युरोपात व्यापारात फायदा होऊ शकतो. युरोपियन बाजारपेठेत अजून विस्तार करता येईल. बदलत्या जागतिक, आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थितीत भारत गुंतवणूक, टेक्नोलॉजी आणि नवीन संधी प्रदान करणाऱ्या देशांसोबत संबंधित विकसित करण्यात प्राधान्य देतोय.
भारताच्या व्यापक युरोप रणनितीचा भाग
भारत आणि युरोपियन देशांमध्ये व्यापार, टेक्नोलॉजी, संरक्षण आणि इनोवेशन क्षेत्रात सहकार्य वेगाने वाढत असताना पंतप्रधान मोदींचा हा दौरा होतोय. म्हणून स्लोवाकियाचा दौरा हा केवळ राजनैतिक कार्यक्रम नाही. भारताच्या व्यापक युरोप रणनितीचा भाग आहे.