S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदीबाबत भारतासोबत चर्चा सुरू : रशियाचे राजदूत

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा रशियाने तीव्र निषेध केला आहे. रशियाचे राजदूत या घटनेला गंभीर गुन्हा असे संबोधले असून, रशिया भारताच्या सोबत उभा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास संदेश पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदीबाबत भारतासोबत चर्चा सुरू : रशियाचे राजदूत
Russian Ambassador
Image Credit source: IANS
| Edited By: | Updated on: May 28, 2025 | 7:44 PM

दहशतवादाविरोधात भारताने उचललेली पावले, सैन्याचे शौर्य आणि S-400 च्या वापराबाबत रशियाचे राजदूत डेनीस अलीपोव्ह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताने आपली उद्दिष्टे स्पष्टपणे ठरवली असून त्यानुसार कारवाई केली आहे. भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केले असून त्यांचा नाश केला जाईल, असे अलीपोव्ह यांनी स्पष्ट केले. आमच्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान S-400 प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचाही त्यात समावेश होता. ही शस्त्रे अत्यंत प्रभावी ठरली, असेही त्यांनी सांगितले.

रशियाचे राजदूत डेनीस अलीपोव्ह यांनी आयएएनएसशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. भारत आणखी S-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना अलीपोव्ह म्हणाले, या विषयावरही आमच्यात चर्चा सुरू आहे, जसे इतर अनेक मुद्द्यांवर आहे.

 

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतही रशियाचे राजदूत अलीपोव्ह यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी या हल्ल्याला गंभीर गुन्हा असे संबोधले. रशिया सहित अनेक देशांनी या घटनेनंतर भारताला पाठिंबा दिला होता.

 

या हल्ल्याची माहिती मिळताच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष संदेश पाठवला होता. त्यात त्यांनी आपला शोक व्यक्त करत, गुन्हेगारांना ओळखून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

दहशतवाद सीमापारचा असो किंवा अन्य कोणताही, त्याविषयी दुटप्पी धोरण असू नये, असे आम्ही नेहमी सांगत आलो आहोत, असं अलीपोव्ह यांनी सांगितले.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतातच तयार करण्यात आले आहे. हे भारत-रशिया संयुक्त सहकार्यातून विकसित झालेले शस्त्र आहे. ही क्षेपणास्त्रे डिझाईन व उत्पादनासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. भविष्यातही अशा अनेक योजनांचा विस्तार करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे त्यांनी नमूद केले. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या यशाबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 प्रणालीच्या वापराबाबतही माहिती दिली. भारत आणि मॉस्को दरम्यान आणखी S-400 हवाई संरक्षण प्रणाली युनिट्सच्या खरेदीसंबंधी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.