‘रशियाने 50 दिवसांत शस्त्रसंधी करावी, अन्यथा…’, पुतिन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प संतापले, दिली टॅरिफची धमकी

अनेक माजी राष्ट्राध्यक्षांना पुतिन यांनी मुर्ख बनवले आहे. त्यांनी युक्रेनविरुद्ध आक्रमकता सुरुच ठेवली तर त्याचे गंभीर परिणाम होणार आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे चर्चा होत नाही तर कारवाई होते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

रशियाने 50 दिवसांत शस्त्रसंधी करावी, अन्यथा..., पुतिन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प संतापले, दिली टॅरिफची धमकी
| Updated on: Jul 15, 2025 | 8:08 AM

Trump Warns Russia: नोबेल परितोषिकाचे वेध लागलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर संतापले आहेत. रशियाकडून युक्रेनवर होणाऱ्या हल्ल्यांवर टीका करताना ट्रम्प यांनी पुतिन यांना गंभीर इशारा दिला आहे. पुतिन यांनी युद्ध सुरू ठेवले तर त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे, असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच रशियाला युक्रेनसोबत युद्धबंदी करार करण्यासाठी ५० दिवसांची मुदतही त्यांनी दिली.

रशियावर १०० टक्के टॅरिफ लावणार?

रशियाने ५० दिवसांच्या आत युक्रेनसोबत युद्धबंदीचा करार केला नाही तर १०० टक्के टॅरिफ लावण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. पुतिन यांच्यावर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अनेक माजी राष्ट्राध्यक्षांना पुतिन यांनी मुर्ख बनवले आहे. त्यांनी युक्रेनविरुद्ध आक्रमकता सुरुच ठेवली तर त्याचे गंभीर परिणाम होणार आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे चर्चा होत नाही तर कारवाई होते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

युक्रेनला हवाई संरक्षण प्रणाली देणार

मास्कोने ५० दिवसांत शस्त्रसंधी करार करावा, अन्यथा रशियावर १०० टक्के टॅरिफ लावण्यात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मी व्यापाराचा वापर अनेक गोष्टींसाठी करतो. युद्ध थांबवण्यासाठीही त्याचा वापर करणार आहे. रशियाच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी यूक्रेनला आम्ही पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली देणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प फक्त रशियालाच नाही तर रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांनाही टॅरिफ लावणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब भारतासह अनेक देशांना अडचणीत आणणार आहे.

चांगली चर्चा करतात अन् रात्री बॉम्ब टाकतात

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतरही रशिया आणि युक्रेनमधील चर्चा अयशस्वी झाली, याबद्दल निराशा व्यक्त करत ट्रम्प म्हणाले, मला वाटले पुतिन जे बोलतात ते करतात. ते खूप छान बोलतात आणि नंतर रात्री बॉम्ब टाकतात. आम्हाला त्यांची ही पद्धत आवडली नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.