War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटणार? अमेरिका आगीत तेल ओतण्यास तयार, पुतीन चिंतेत

गेल्या काही काळापासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध भडकताना दिसत आहे. अमेरिका आता युक्रेनला टोमाहॉक क्षेपणास्त्र देण्याच्या विचारात आहे. उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी याबाबत माहिती दिली आहे.

War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटणार? अमेरिका आगीत तेल ओतण्यास तयार, पुतीन चिंतेत
Russia ukraine and Trump
| Updated on: Sep 29, 2025 | 6:28 PM

गेल्या काही काळापासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध भडकताना दिसत आहे. जगभरातील देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र युद्ध अद्याप थांबलेले नाही. अशातच आता आगामी काळात हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका आता युक्रेनला टोमाहॉक क्षेपणास्त्र देण्याच्या विचारात आहे. उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिका टोमाहॉक क्षेपणास्त्र देण्यास तयार

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी रशिया युक्रेन युद्धावर भाष्य केले आहे. युक्रेनने रशियाकडे टोमाहॉक क्षेपणास्त्राची मागणी केली आहे. यावर बोलताना व्हान्स म्हणाले की, ‘युरोपीय नाटो सदस्य देशांनी ही टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करावीत आणि नंतर ती युक्रेनला हस्तांतरित करावीत. आम्ही अनेक युरोपीय देशांकडून मिळालेल्या अशा प्रस्तावांवर विचार करत आहोत. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हे डोनाल्ड ट्रम्प घेतील.’

रशियाच्या राजधानीवर होऊ शकतो हल्ला

टोमाहॉक हे एक सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. याची रेंज 2,500 किलोमीटरपर्यंत आहे. याच्या वॉरहेडचे वजन 450 किलोग्रॅमपर्यंत आहे. हे क्षेपणास्त्र युरोपमधून सोडले जाणारे ते रशियाची राजधानी मॉस्कोच्या आसपास पोहोचू शकते. न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वेळी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी यावर आगामी काळात निर्णय घेऊ असं उत्तर दिलं होतं.

रशियाचा युरोपियन देशांना गंभीर इशारा

दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपियन देशांना गंभीर इशारा दिला होता. जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला रशियामध्ये हल्ले करण्यास क्षेपणास्त्रांबद्दल गुप्त माहिती दिली तर ते संबंधित देश युद्धात सहभागी झाला असल्याचे मानले जाईल आणि त्या देशावर हल्ला केला जाईल असं पुतीन यांनी म्हटलं होतं. व्हॅन्सच्या विधानावर बोलताना रशियन अधिकारी दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, ‘रशिया सध्या अमेरिकेच्या विधानाचे विश्लेषण करत आहे.’ पुढे बोलताना पेस्कोव्ह यांनी, ‘ही क्षेपणास्त्रे कोण डागेल. युक्रेनियन सैन्य डागेली की अमेरिकन सैन्यही यात सहभागी असेल?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.