असं एक गाव जिथे फक्त महिलाच राहतात, पुरुष वाऱ्यालाही फिरकत नाही, असं का?

केनियातील उमोजा हे महिलांचे एक अनोखे गाव आहे, जे लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचारातून वाचलेल्या महिलांनी वसवले आहे. येथे महिलांना सुरक्षित आश्रय मिळतो, त्यांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होतो आणि शिक्षण व आर्थिक स्वावलंबनाद्वारे त्या स्वतःचे जीवन सुधारतात. हे गाव महिला सबलीकरण आणि एकतेचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे.

असं एक गाव जिथे फक्त महिलाच राहतात, पुरुष वाऱ्यालाही फिरकत नाही, असं का?
umoja village in kenya
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 4:55 PM

तब्बल 30 वर्षापूर्वी उत्तर केनियामध्ये राहणाऱ्या जेन नोलमोंगनचा एका ब्रिटिश सैनिकाने बलात्कार केला. हे कळल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला घरातून बाहेर काढलं. त्यामुळे जेनवर आभाळच कोसळलं. कुठं जावं आणि कुठे नाही? असा प्रश्न तिच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे ती सुरक्षित जागेचा शोध घेत आपल्या मुलांसोबत एका गावात पोहोचली. हे गाव पूर्णपणे महिलाच चालवतात. या ठिकाणी एकही पुरुष येऊ शकत नाही. वाऱ्यालाही उभा राहू शकत नाही.

गेल्या तीन दशकांपासून जेन या गावात राहत आहे. सांबुरू काऊंटीतील उमोजा या गावात ती आपल्या आठ मुलांसोबत राहते. इथेच शेती करते. आता या गावातील शेत तिच्या नावावर झालंय. त्यामुळे जेन खूश आहे. केन्यातील 98 टक्के जमीन केवळ पुरुषांच्या नावावर आहे. अनेक कबिल्यांमध्ये महिलांनाही आईवडिलांच्या संपत्तीत भागिदारी मिळते. जेन आता 52 वर्षाची झाली आहे. ती म्हणते, हा गावच आमचा सहारा आहे. आम्ही आमचं जीवन सुधारण्यासाठी या गावात काम केलं. एकमेकींना अधिकाराची माहिती समजावून दिली, असं जेन म्हणते.

Loading...

गावात कोण राहतं?

1990मध्ये हे गाव वसवण्यात आलं. या गावात लैंगिक अत्याचाराच्या बळी पडलेल्या महिला, घरातून काढण्यात आलेल्या महिला, संपत्तीतून बेदखल झालेल्या, मुलांनी नाकारलेल्या महिला, बालविवाह किंवा खतन्यामुळे घरातून पळून गेलेल्या महिला या गावात राहतात. प्रशासनाने या महिलांच्या नावावर शेत जमिनी केल्या आहेत. सामाजिक व्यवस्थेत या महिलांना हा अधिकार कधीच मिळाला नसता. पण या प्रशासनाने पुढाकार घेऊन या गावातील महिलांना हा अधिकार दिला आहे.

उमोजा म्हणजे एकता

स्वाहिली भाषेत उमोजाचा अर्थ एकता होतो. रेबेका लोलोसोली नावाच्या महिलेने या गावाला हे नाव दिलं आहे. खतना करण्यास विरोध केल्यामुळे काही लोकांनी या महिलांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. त्यावेळी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या मनात असं एक गाव निर्माण करण्याचा विचार आला. या गावात फक्त महिलाच राहतील, पुरुष तिकडे फिरकणारही नाही, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. त्या दिशेने रेबेका लोलोसोली यांनी पुढाकार घेऊन गावाची निर्मिती केली. आधी या गावात फक्त 15 महिला राहत होत्या. आता या गावात 50 हून अधिक कुटुंब आहेत. या गावात महिलांनीच घरांपासून शाळांपर्यंतची निर्मिती केली. मध आणि हाताने विणलेल्या वस्तू बनवून या महिला विकतात, त्यातूनच त्यांचं अर्थार्जन चालतं.

जेनचा मुलगा पोलीस

जेनने मुलांना शिकवून त्यांच्या पायावर उभं केलं आहे. तिचा एक मुलगा पोलीस दलात भरती झालाय. एक मुलगी पत्रकार झाली आहे. हे दोन्ही मुलं लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us