
गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर घडामोडींना वेग आला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर कब्जा केला आहे. आता पुढील काही काळ या देशावर अमेरिकेचे वर्चस्व असणार आहे. गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेमधील संबंध थोडे ताणलेले आहेत. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. यातील 25 टक्के कर हा रशियन तेलाची खरेदी करत असल्यामुळे लावण्यात आलेला आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबतही चर्चा सुरू आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला सर्वात मोठी ऑफर दिली आहे. याचा भारताला फायदा होऊ शकतो, पण रशियाला फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेने कब्जा केलेल्या व्हेनेझुएला देशात तेलाचे मोठे साठे आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. मात्र यावर पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की, भारताला व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, मात्र यासाठी अटी काय असतील याबाबत निर्णय अंतिम झालेला नाही. आता भारताने ही ऑफर स्वीकारली तर रशियावर थेट परिणाम होऊ शकतो. कारण भारत रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला आधार मिळत आहे, मात्र भारताने तेल खरेदी बंद केल्यास पुतीन यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जगाचे लक्ष भारताकडे लागले आहेत.
अमेरिकन सरकारने म्हटले आहे की, व्हेनेझुएलाचे तेल बाजारात परत येऊ शकते, मात्र व्हेनेझुएला ते थेट विकू शकणार नाही. अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस्टोफर राईट यांनी म्हटले की, ‘व्हेनेझुएलाचे तेल अमेरिकेच्या देखरेखीखाली विकले जाईल आणि त्यातून मिळणारे उत्पन्न अमेरिकेद्वारे नियंत्रित केले जाईल. याचा अर्थ असा की, तेल जरी व्हेनेझुएलाचे असले तरी अमेरिका त्याच्या किंमती, खरेदीदार आणि वित्तपुरवठ्यावर नियंत्रण ठेवेल.
अमेरिकेच्या निर्बंधांपूर्वी, भारत व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत होता. व्हेनेझुएलाचे जड कच्चे तेल भारताच्या जटिल रिफायनरीजसाठी अत्यंत योग्य मानले जाते. त्यामुळे भारताने तेल खरेदीला सुरूवात केली तर भारताला आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्यास मदत होऊ शकते. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळू शकतो. आता अमेरिकेच्या ऑफरवर भारत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.