‘नरकाचे दरवाजे उघडणार…’, इस्त्राइल ओलीसांना सोडले नसल्याने हमासला डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य हमासच्या घोषणेनंतर आले. हमासने पुढील सूचनेपर्यंत इस्त्रायल ओलीसांची सुटका थांबवल्याचे म्हटले होते. हमासने इस्त्राइलवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

नरकाचे दरवाजे उघडणार..., इस्त्राइल ओलीसांना सोडले नसल्याने हमासला डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Feb 11, 2025 | 7:54 AM

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबले आहे. सध्या युद्धविराम सुरू आहे. या युद्धबंदी अंतर्गत हमास इस्रायली ओलीस सोडत आहे. मात्र आता हमासने इस्रायलवर युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच ओलीसांची सुटका थांबवण्याची धमकी दिली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले आहे. त्यांनी हमासला आता ‘नरकाचे दरवाजे उघडणार…’ असा थेट इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला इशारा देताना म्हटले आहे की, हमासने गाजामध्ये ठेवलेल्या इस्त्राइल ओलीसांना शनिवारपर्यंत सोडावे. हमासने इस्त्रायल ओलीसांना सोडले नाही तर दोघांमधील सुरु असलेले युद्धबंदी संपवली जाईल. तसेच हमासचा खात्मा करण्याचा प्रस्ताव ठेवला जाईल. ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी निर्वासितांबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले की जर जॉर्डन आणि इजिप्तने गाझामधील पॅलेस्टिनी निर्वासितांना स्वीकारण्यास नकार दिला तर ते त्यांची मदत थांबवू शकतात.

डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य हमासच्या घोषणेनंतर आले. हमासने पुढील सूचनेपर्यंत इस्त्रायल ओलीसांची सुटका थांबवल्याचे म्हटले होते. हमासने इस्त्राइलवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यामुळे दोघांमधील संघर्ष पुन्हा सुरु होऊ शकतो, असेही म्हटले आहे. इस्त्रायलने दिलेले आश्वासन पाळावे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे हमासने म्हटले आहे.

शनिवार होणार होती ओलिसांची सुटका

युद्धबंदी करारानुसार, हमास पॅलेस्टिनी कैदी आणि बंदिवानांच्या बदल्यात शनिवारी आणखी इस्रायली ओलीस सोडणार होता. गेल्या तीन आठवड्यांपासून या पद्धतीने ओलीस सोडले जात आहे. हमासच्या घोषणेनंतर इस्त्रालयमध्ये ओलीसांचा परिवार आणि समर्थक एकत्र आले. त्यांनी धरणे प्रदर्शन केले. आंदोलकांनी करार तोडू नये, अशी मागणी सरकारकडे केली. या निदर्शनात २ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते.

दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ म्हणाले की, हमासच्या घोषणेमुळे युद्धविराम कराराचे उल्लंघन होत आहे. आता आम्ही आमच्या संरक्षणासाठी सर्वोच्च तयारी करणार आहे. यासंदर्भातील निर्देश सैन्याला दिले आहेत.