
इस्रायलने मागच्या आठवड्यात इराणमध्ये घुसून हमासचा प्रमुख इस्माइल हानियाला संपवलं. खरंतर इराणसाठी ही सर्वात मोठी चपराक आहे. ही हत्या झाली त्या दिवसापासून इराण आम्ही बदला घेणार अशी धमकी देतोय. पण अजूनपर्यंत इराणकडून कोणताही हल्ला झालेला नाही. इराणने युद्धासाठी कंबर कसली आहे. इराणी सैन्याने इस्रायलवर हल्ला करण्याआधी ड्रील सुरु केलीय, असं म्हटलं जातय. त्यासाठी इराणने आपलं हवाई क्षेत्र सुद्धा बंद केलं आहे. आता काही रिपोर्ट्स आलेत, त्यानुसार इराण पुढच्या आठवड्यात हल्ला करणार असं म्हटलं जातय.
आधी अशी शक्यता वर्तवली जात होती की, इराण 7 किंवा 8 ऑगस्टला इस्रायलवर हल्ला करेल. पण आता युद्धाची नवीन तारीख समोर आलीय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराण 12 आणि 13 ऑगस्ट दरम्यान इस्रायलवर हल्ला करु शकतो. इस्रायलमधील प्रतिष्ठीत वर्तमानपत्र जेरुसलम पोस्टनुसार, इराण पुढच्या आठवड्यात इस्रायलवर हल्ला करु शकतो. जेरुसलेम पोस्टने हे वृत्त गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिलं आहे.
हल्ल्याबाबत नवीन अंदाज काय?
गोपनीय यंत्रणांनुसार, इराण 12 आणि 13 ऑगस्ट दरम्यान इस्रायलवर हल्ला करु शकतो. हा हल्ला कसा असेल? किती मोठा असेल? या बद्दल काही अंदाज लावता येणार नाही. इराण यावेळी इस्रायलवर 2 हजारपेक्षा जास्त मिसाइल डागू शकतो, असा अंदाज आहे.
इराणने एप्रिलमध्ये इस्रायलवर हल्ला का केलेला?
इराणने याआधी यावर्षी एप्रिल महिन्यात इस्रायलवर पहिल्यांदा थेट हल्ला केला होता. त्यावेळी इराणने डागलेली बहुतांश मिसाइल्स इस्रायलने हवेतच नष्ट केली होती. इराणकडून ही प्रत्युत्तराची कारवाई होती. कारण 1 एप्रिलला इस्रायलने सीरियामधील इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला. त्यात 2 इराणी कमांडर्ससह 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता. आताही असच म्हटलं जातय, इराण बरोबर 13 दिवसांनी इस्रायलवर हल्ला करुन इस्माइन हानियाच्या मृत्यूचा बदला घेईल.
अमेरिका टेन्शनमध्ये
इराण-इस्रायल संभाव्य युद्धाच्या शक्यतेमुळे अमेरिकेच टेन्शन वाढलं आहे. अमेरिकेने दोन्ही देशांना मीडल ईस्टमध्ये संघर्ष वाढवू नका, म्हणून अपील केलय. ‘इस्रायलच कोणत्याही हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केलय.