जुन्या इमारतींचा पुनर्विकास, मेट्रोचं जाळं अन् व्यावसायिक विस्तार; ‘या’ शहराचा चेहरामोहराच बदलतोय!

Mumbai News: निवासी उपनगराची ओळख मागे टाकत गोरेगाव मिश्र-वसाहतीचे केंद्र बनत आहे. निवासी वसाहतींसोबत उद्योग आणि रिटेल क्षेत्राचाही विस्तार होत आहे.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास, मेट्रोचं जाळं अन् व्यावसायिक विस्तार; या शहराचा चेहरामोहराच बदलतोय!
| Updated on: Nov 25, 2026 | 9:37 PM

एकेकाळी प्रामुख्याने निवासी उपनगर म्हणून ओळख असलेले गोरेगाव आता नवी ओळख निर्माण करत आहे. रस्ते आणि मेट्रोचे सुधारित जाळे, मोठ्या प्रमाणावरील पुनर्विकास प्रकल्प आणि व्यावसायिक केंद्रांच्या वाढत्या विस्तारामुळे येथील वसाहतीच्या स्वरूपात बदल होत आहेत. निवासी वसाहती, उद्योग आणि रिटेल व्यवसायांची केंद्रे यांचा संगम झालेले उपनगर म्हणून गोरेगाव विकसित होत असल्याचे महत्वपूर्ण मत रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे.

उपलब्ध जमिनीची कमतरता आणि नागरी पुनर्विकासाची गरज यामुळे गोरेगाव पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांमध्ये विविध वसाहतींच्या पुनर्विकासाला वेग आला आहे. 1960 आणि 1970 च्या दशकात बांधण्यात आलेल्या शेकडो जुन्या इमारतींमधील गृहनिर्माण संस्था आता पुनर्विकासाचा पर्याय स्वीकारत आहेत. सीबीआरई इंडियाचे भांडवली बाजार विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सहप्रमुख निखिल भाटिया म्हणाले, म्हाडाच्या मोतीलाल नगर संकुलासह पुनर्विकासाच्या मोठ्या उपक्रमांमुळे गोरेगावच्या परिवर्तनाला अधिक बळ मिळत आहे.

Loading...

12.2 किलोमीटर लांबीच्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे या भागाच्या रस्ते वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या दोन बोगद्यांच्या माध्यमातून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. यासह, प्रस्तावित वर्सोवा-भाईंदर सागरी मार्गामुळे पश्चिम उपनगरांमधील उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पासाठी मालाडमधील माइंडस्पेसजवळ नियोजित जोडरस्ता असून, त्याद्वारे हा मार्ग जीएमएलआरलादेखील जोडला जाणार आहे. या भागातील मेट्रोचे जाळेही विस्तारत असून सध्या कार्यान्वित असलेली मेट्रो मार्गिका 2-अ गोरेगावला अंधेरी, मालाड, कांदिवली आणि दहिसरशी जोडते. आगामी मेट्रो मार्गिका 2-ब आणि 6 मुळे बीकेसी, पवई आणि पूर्व उपनगरांमध्ये पोहोचणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. तसेच मेट्रो मार्गिका 7 चा मीरा-भाईंदर आणि विमानतळापर्यंत विस्तार करण्याचे नियोजन आहे.

गोरेगाव आणि राम मंदिर ही रेल्वे स्थानके तसेच या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईच्या विविध भागांशी गोरेगावची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे गोरेगावातील व्यावसायिक घडामोडींनाही चालना मिळत आहे. माइंडस्पेस, नेस्को, निलॉन नॉलेज पार्क आणि फिल्म सिटी यांसारखी व्यावसायिक क्षेत्रे आणि रोजगार केंद्रे तसेच ओशिवरा डेव्हलपमेंट सेंटर यामुळे कार्यालये, निवासी संकुले, खरेदी आणि मनोरंजनाच्या सुविधा यांचा समावेश असलेली मिश्र स्वरूपाची अनेक केंद्रे विकसित होत आहेत.

कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि रोजगार केंद्रांशी असलेली जवळीक यामुळे गोरेगावमधील मालमत्तांची मागणी वाढत असल्याचे विकासक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीपासून 2026 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंतच्या प्रकल्पांच्या आकडेवारीनुसार, गोरेगावच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांमध्ये मालमत्तांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

गोरेगाव पूर्वमध्ये 2022 मध्ये कार्पेट क्षेत्रफळानुसार प्रति चौरस फूट 26,831 रुपये असलेली सरासरी विक्री किंमत 2026 मध्ये 40,430 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या कालावधीत सुमारे 51 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गोरेगाव पश्चिममध्ये याच कालावधीत मालमत्तांची भारित सरासरी विक्री किंमत 23,926 रुपयांवरून 32,944 रुपये प्रति चौरस फुटांपर्यंत वाढली आहे. ही वाढ सुमारे 38 टक्के आहे.

गोरेगाव पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांमध्ये नव्या घरांच्या पुरवठ्याचे आणि विक्रीचे स्वरूपही वेगवेगळे असल्याचे दिसते. गोरेगाव पूर्वमध्ये 2025 मध्ये 767 सदनिका (अपार्टमेंट्स) विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. त्यापैकी 348 अपार्टमेंट्सची विक्री झाली. दुसरीकडे, गोरेगाव पश्चिममध्ये 1,323 अपार्टमेंट्स विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले, त्यापैकी 899 अपार्टमेंट्सची विक्री झाली.

2026 मध्ये तिसऱ्या तिमाहीपर्यंत गोरेगाव पूर्वमध्ये 241 अपार्टमेंट्सची विक्रीसाठी सुरुवात झाली असून, त्यापैकी 35 अपार्टमेंट्सची विक्री झाली आहे. तर गोरेगाव पश्चिममध्ये 1,333 अपार्टमेंट्स विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून, त्यापैकी 424 अपार्टमेंट्सची विक्री झाली आहे. या आकडेवारीवरून गोरेगाव पश्चिममध्ये नव्या घरांच्या पुरवठ्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. येथे नव्या घरांच्या विक्रीसाठी झालेल्या सुरुवातीच्या तुलनेत प्रत्यक्ष विक्रीचे प्रमाण कमी आहे.

गोरेगाव पूर्वमध्येही 2026 च्या पहिल्या नऊ महिन्यांत घरांच्या नव्या पुरवठ्याच्या तुलनेत विक्रीतील अंतर वाढले आहे. येथे ‘ॲब्सॉर्प्शन’ म्हणजे संबंधित वर्षात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या घरांपैकी झालेली एकूण विक्री आहे, असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. द गार्डियन्स रिअल इस्टेट ॲडव्हायजरीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राम नाईक म्हणाले, “गोरेगावची वाढ आता वेगवेगळ्या स्वरूपात होत आहे. पूर्व गोरेगाव अधिक मोठे व्यावसायिक आणि रोजगार केंद्र म्हणून विकसित होत आहे. तर पश्चिम गोरेगावला प्रस्थापित निवासी मागणी, रिटेल व्यावसायिक पायाभूत सुविधा आणि पुनर्विकासाचा लाभ मिळत आहे.”

म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या परिवर्तनाचा व्यापक आवाका लक्षात घेता समन्वित नियोजनाची आवश्यकता आहे. “क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे होणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पांच्या तुलनेत सुविधा आणि पायाभूत सुविधांचे अधिक प्रभावी केंद्रीकरण करता येऊ शकते,” असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us