ऑक्सिजनशिवाय तासन्तास पाण्यात कशा राहतात या महिला? वैज्ञानिकांनी उघड केलं रहस्य

दक्षिण कोरियातील ‘हेन्यो’ महिला खोल पाण्यात जाऊन मासेमारी करतात, त्यांची जीवनशैली वैज्ञानिकांनाही थक्क करणारी आहे. या महिलांची आरोग्यदायी आणि दीर्घायुष्याची गुपिते अद्भुत आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धती आणि जीवनशैलीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी लेख वाचा.

ऑक्सिजनशिवाय तासन्तास पाण्यात कशा राहतात या महिला? वैज्ञानिकांनी उघड केलं रहस्य
woman in underwater
| Edited By: | Updated on: Jun 08, 2025 | 6:34 PM

दक्षिण कोरियाच्या जेजू बेटावर राहणाऱ्या ‘हेन्यो’ महिलांची परंपरा आणि क्षमतांचा अभ्यास आता संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनत आहे. ऑक्सिजन सिलिंडरशिवाय समुद्रात 18 मीटर खोलपर्यंत गोता मारणाऱ्या या महिलांचा शारीरिक सहनशक्ती, मानसिक स्थैर्य आणि अनोखी जीवनशैली यांचा संगम विज्ञानालाही नवा मार्ग दाखवतोय. या महिलांचा उद्देश असतो समुद्री शैवाल, शंख, सीप, मासे आणि विशेषतः अबालोन – एक प्रकारची मौल्यवान समुद्री गोगलगाय – गोळा करणे. शतकानुशतके चालत आलेली ही मातृसत्ताक परंपरा आजही 60 ते 80 वयोगटातील महिला जोमाने जपतात.

या महिलांची दिवसभराची दिनचर्या एखाद्या साहसिक जीवनशैलीसारखीच असते. त्या दररोज 4 ते 5 तास खोल समुद्रात काम करतात. विशेष म्हणजे, त्यांच्या या कौशल्यामागे केवळ कठोर सरावच नाही, तर त्यांचा विशिष्ट डीएनएदेखील महत्त्वाची भूमिका बजावतो. Cell Reports या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, हेन्यो महिलांच्या डीएनएमध्ये दोन अद्वितीय बदल आढळले आहेत.

पहिला बदल असा आहे की, गोता घेताना त्यांचा रक्तदाब स्थिर राहतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. विशेष बाब म्हणजे, काही महिला गर्भवती असतानाही हे काम करत असल्याने, रक्तदाबाचे नियंत्रण त्या आणि त्यांच्या बाळासाठी सुरक्षित ठरते. दुसरा बदल म्हणजे थंडी सहन करण्याची क्षमता – 0 डिग्री सेल्सियस इतक्या थंड पाण्यातही त्या सहज काम करू शकतात.

हेन्यो महिलांच्या या गुणधर्मांचा व्यापक परिणाम त्यांच्या संपूर्ण आरोग्यावर दिसून येतो. सामान्य माणसाच्या तुलनेत त्यांचे हृदयाचे ठोके गोता घेताना दुप्पट कमी होतात, ज्यामुळे त्या कमी ऑक्सिजनमध्येही दीर्घकाळ टिकू शकतात. परिणामी, त्यांच्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकसारख्या आजारांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

या महिलांचा डीएनए जेजू बेटावरील 33% लोकांमध्ये आढळतो, तर कोरियाच्या मुख्य भूभागावर तो केवळ 7% लोकांमध्ये आहे. यामुळे जेजूच्या महिलांना प्रीक्लॅम्पसियासारख्या गर्भावस्थेतील गुंतागुंतींपासून संरक्षण मिळतं. परंतु फक्त डीएनएच नव्हे, तर त्यांच्या कठोर सरावाचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे.

हेन्यो महिलांची परंपरा ही पूर्णतः मातृसत्ताक असून, या कौशल्याचा वारसा आई आपल्या मुलीला देते. ही परंपरा केवळ उपजीविकेपुरती मर्यादित नसून, ती त्यांच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यांच्या बोली भाषेमध्ये लहान, जलद वाक्यांचा वापर केला जातो, कारण त्यांना समुद्रातून वर येताच त्वरेने संवाद साधावा लागतो. 2016 मध्ये युनेस्कोने हेन्यो परंपरेला अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे.