
रल्वेचे नियम हे बदत असतात. त्यात अनेक गोष्टी समाविष्ट केल्या जातात तर काहीवेळेला काही नियम हे कमी केले जातात. तर काहीवेळी नियमांबाबत करोठ दंडाची घोषणा केली जाते. आताही असाच एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आणि त्यासोबतच तो नाही पाळला तर दंडही आकारण्यात येणार आहे. हा नियम विमानाच्या नियमाप्रमाणे बनवण्यात आला आहे. होय, रेल्वेचा नवीन नियम हा जड सामानांबद्दल असणार आहे.
जड बॅगा घेऊन बाहेर जात असाल तर आता थोडे सावधगिरी बाळगा.
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करताना जड बॅगा घेऊन बाहेर जात असाल तर आता थोडे सावधगिरी बाळगा. रेल्वे आता प्रवाशांच्या सामानावर लक्ष ठेवण्याची तयारी करत आहे. ज्याप्रमाणे विमानतळावर बॅगांचे वजन केले जाते, तसाच नियम आता ट्रेनमध्येही लागू होणार आहे. म्हणजेच ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
प्रवाशांना रेल्वे स्थानकावर त्यांच्या सामानाचे वजन करावे लागणार
मनी कंट्रोलच्या एका वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयातील माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, आता प्रवाशांना रेल्वे स्थानकावर त्यांच्या सामानाचे वजन करावे लागणार आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन यंत्रे बसवण्यात येणार आहेत. आणि जर बॅग निर्धारित वजनापेक्षा जास्त असेल तर थेट दंड आकारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर आणि अलीगढ सारख्या मोठ्या स्थानकांवर हा नियम लागू करण्यात आला आहे.
कोणत्या बर्थमध्ये किती सामान वाहून नेले जाऊ शकते?
खरंतर हा नियम आधीही रेल्वेने ठरवून दिलाच होता पण आता त्याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाच्या वर्गानुसार सामान वाहून नेण्याची मर्यादा निश्चित केली जाणार आहे. फर्स्ट एसीमध्ये जास्तीत जास्त वजनाचे सामान आणि जनरल क्लासमध्ये किमान वजनासाठी सूट दिली जाणार आहे.
प्रवाशांनो हे नियम लक्षात ठेवा
फर्स्ट ACमध्ये प्रवास करणाऱ्यांना 70 किलो सामान वाहून नेण्याची परवानगी असेल आणि त्यासोबत 15 किलो अतिरिक्त सामानाची सूट मिळेल. गरज पडल्यास पार्सल व्हॅनमध्ये 65 किलोपर्यंत सामान बुक करता येईल. सेकंड एसीसाठी 50 किलोची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, तर 10 किलो अतिरिक्त सामानाची सूट मिळेल. तसेच पार्सल व्हॅनमध्ये 30 किलो जास्त सामान वाहून नेता येईल. थर्ड एसी आणि एसी चेअर कारमध्ये प्रवास करणाऱ्यांना 40 किलोपर्यंत सामान वाहून नेण्याची परवानगी आहे. 10 किलो भत्ता देखील आहे. पार्सल व्हॅनमध्ये 30 किलो जास्त सामान बुक करता येईल.
स्लीपर क्लाससाठी नियम काय?
स्लीपर क्लासमध्ये, 40 किलोपर्यंतचे सामान मोफत असेल, 10 किलोपर्यंतची अतिरिक्त सूट देखील दिली जाईल. पार्सल व्हॅनमध्ये 70 किलोपर्यंतचे बुकिंग करता येईल. जनरल/सेकंड क्लासचे प्रवासी 35 किलोपर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकतात, त्यासोबत 10 किलोची सूटही दिली जाणार आहे . याशिवाय, पार्सल व्हॅनमध्ये 60 किलोपर्यंतचे सामान पाठवता येईल.
बॅगचा आकार देखील ठरवला जाणार
फक्त वजनच नाही तर तुमच्या बॅगेचा आकार देखील निर्धारित मर्यादेत असावा लागणार आहे. साधारणपणे, ट्रंक, सुटकेस किंवा बॉक्सचा आकार 100 सेमी x 60 सेमी x 25 सेमी पेक्षा जास्त नसावा. एसी थर्ड क्लास आणि चेअर कारसाठी, ही मर्यादा आणखी कमी असते म्हणजेच 55 सेमी x 45 सेमी x 22.5 सेमी. जर तुमची बॅग यापेक्षा मोठी असेल, तर ती ब्रेक व्हॅनने पाठवावी लागेल आणि त्यासाठी किमान 30 रुपये शुल्क आकारले जाईल.
5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही सामानाचा हा नियम लागू असणार आहे.
5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही सामानाचा हा नियम लागू असणार आहे. पण तो फक्त अर्ध्या रकमेचा. याचा अर्थ ते प्रौढांइतके वजन वाहून नेऊ शकत नाहीत. तसेच, 50 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. जर एखाद्या प्रवाशाने मोठी बॅग घेऊन प्रवास केला आणि रस्ता अडवला किंवा त्रास दिला तर त्याला दंड आकारला जाणार आहे.
अतिरिक्त सामानासाठी किती शुल्क आकारले जाईल?
जर तुम्ही ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान नेले असेल तर तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील. अतिरिक्त सामानासाठी तुमच्याकडून सामान्य बुकिंग दराच्या 1.5 पट शुल्क आकारले जाईल. तुम्हाला किमान 30 रुपये द्यावे लागतील आणि मोजणी सुरु होईल ते 10 किलो वजन आणि 50 किमी अंतरापासून. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे नियम आवश्यक आहेत, विशेषतः सण किंवा सुट्टीच्या काळात, जेव्हा गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात.
जड सामानासाठी वेगळे बुकिंग आवश्यक
जर तुम्ही ट्रेनमध्ये स्कूटर, सायकल किंवा कोणतेही जड सामान घेऊन जात असाल तर ते मोफत नसणार आहे. यासाठी आगाऊ स्वतंत्र बुकिंग करावे लागणार आहे. जर सामान जास्त असेल तर रेल्वे पार्सल ऑफिसमध्ये जाऊन आधीच यासाठी बुकिंग करणे आवश्यक असणार आहे. शेवटच्या क्षणी समस्या येऊ शकते आणि प्रवासादरम्यान तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. त्यासाठी रेल्वेचे हे नियम आताच लक्षात ठेवा आणि पाळा.