
साल 2025 सुरू झाला असून, डिजिटलायझेशनच्या युगात नोकरी शोधण्याची प्रक्रिया झपाट्याने बदलत आहे. कंपन्यांकडे आज वेळेची कमतरता असून, प्रत्येक उमेदवाराचे CV सखोलपणे वाचले जात नाही. त्यामुळेच आता जुन्या पद्धतीचे रिझ्युमे चालत नाहीत. त्याऐवजी कमी पण योग्य आणि प्रभावी माहिती असलेला CV महत्त्वाचा ठरत आहे.
जुन्या रिझ्युमेमधील या गोष्टी तातडीने हटवा!
आजही अनेकजण आपल्या CV मध्ये वैयक्तिक माहिती जसे की वैवाहिक स्थिती, धर्म, जन्मतारीख, आई-वडिलांची नावे अशा बाबी नमूद करतात. परंतु, या माहितीचा नोकरीशी थेट काही संबंध नसतो. यामुळे CV अनावश्यक लांबतो आणि मुख्य गोष्टींचे महत्त्व कमी होते. या जागेचा वापर आपण LinkedIn प्रोफाईल, पोर्टफोलिओ लिंक्स, GitHub प्रोफाईल (IT क्षेत्रासाठी) यासाठी करू शकता. मोबाइल क्रमांक आणि ई-मेल मात्र अनिवार्य असावेत – कारण हेच तुमच्याशी संपर्क ठेवण्यासाठी मुख्य साधन ठरतात.
‘ऑब्जेक्टिव्ह’ ठरवा कंपनीनुसार
एक मोठी चूक अनेक उमेदवार करतात, ती म्हणजे एकच ‘Career Objective’ अनेक ठिकाणी वापरणे. मात्र, प्रत्येक कंपनीची गरज, कार्यपद्धती आणि संस्कृती वेगळी असते. त्यामुळे ज्या संस्थेसाठी अर्ज करत आहात, त्यानुसार ऑब्जेक्टिव्ह ठरवणे गरजेचे आहे. यामुळे HR ला उमेदवाराच्या गंभीरतेचा आणि नोकरीसाठीच्या तत्परतेचा अंदाज येतो.
केवळ नोकरीसाठी सुसंगत अनुभवच नमूद करा
आपल्याकडे अनेक नोकरी किंवा इंटर्नशिपचा अनुभव असतो, पण त्या सर्व नोंदवणं ही चूक ठरू शकते. कारण प्रत्येक अनुभव आवश्यकच असेल असं नाही. त्याऐवजी, संबंधित जॉबच्या भूमिकेशी जुळणारेच अनुभव समाविष्ट करा. यामुळे HR चं वाचन सुकर होतं आणि तुमचं CV अधिक लक्षवेधी ठरतं.
स्पर्धा आणि उपक्रम फक्त गरजेपुरतेच लिहा
शाळेतील लहान वयातील स्पर्धा, निबंध, चित्रकला अशा गोष्टी जर नोकरीशी संबंधित नसतील तर त्यांचा उल्लेख टाळा. त्याऐवजी, शैक्षणिक प्रगती, मिळवलेली स्कॉलरशिप, किंवा संबंधित कोर्सेसचे उल्लेख फायदेशीर ठरू शकतात.
माहिती नसलेली गोष्ट लिहू नका
कधी कधी उमेदवार आपल्या रिझ्युमेमध्ये असे कौशल्य दाखवतात ज्याबद्दल त्यांना सखोल माहिती नसते. पण मुलाखतीदरम्यान HR त्यावर प्रश्न विचारतो आणि उमेदवार गोंधळतो. त्यामुळे अशा गोष्टी टाळा, कारण एक चुकीचा उत्तर तुमच्या संधीवर पाणी फेरू शकतो.