अंबानींनाही टक्कर देतंय मुंबईतील एक कुटुंब, जमीन एवढी की अँटालियाही काहीच नाही… या उद्योजकाचं तुमच्याशीही खास कनेक्शन

मुंबईच्या महागड्या रिअल इस्टेटमध्ये हे कुटुंब हे सर्वात मोठे जमीन मालक आहेत. त्यांच्याकडे मुंबईत, विशेषतः विक्रोळीत, तब्बल 3,400 एकर जमीन आहे. काय आहे नाव ?

अंबानींनाही टक्कर देतंय मुंबईतील एक कुटुंब, जमीन एवढी की अँटालियाही काहीच नाही... या उद्योजकाचं तुमच्याशीही खास कनेक्शन
| Updated on: Aug 31, 2026 | 7:05 PM

मुंबई… स्वप्ननगरी, स्वप्नाचं शहर म्हणून ओळखलं जातं.. महागडी रिअल इस्टेट आणि उंचच उंच इमारतींसाठी देखील हे शहर प्रसिद्ध आहे. मुंबईतील सर्वातं श्रीमंत लोकांचा किंवा त्यांच्या संपत्तीचा विषय निघताच, एकेक मोठमोठ्या उद्योगपतींची नावं ओठी येतात. पण जमिनीच्या मालकीच्या बाबतीत एक असं भारतीय उद्योग घराणं आघाडीवर आहे, ज्यांच्या मालमत्तेपुढे मोठमोठे उद्योगपतीही मागे पडतात. हे ऐकताच अंबानींचं नावं तुमच्या मनात आलं असेल ना.. पण नाही, त्या कुटुंबाचं नाव अंबानी (Ambani Family) नव्हे तर वेगळंच आहे. हे घराणं दुसरं-तिसरं नव्हे तर देशातील प्रसिद्ध गोदरेज कुटुंब ( Godrej Family) आहे. हो, हे खरं आहे.

मुंबईतील तब्बल 3,400 एकर जमिनीवर मालकी

मुंबईचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 1 लाख एकर असल्याचं सांगितलं जातं. यापैकी अंदाजे 34,000 एकर जमीन मानवी वस्ती आणि विकासासाठी योग्य मानली जाते. विशेष म्हणजे, या विकासयोग्य क्षेत्रापैकी जवळपास 3,400 एकर जमीनही गोदरेज समूहाच्या मालकीची असल्याचा दावा केला जातो. ग्राहक उत्पादनं, कृषी, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करणाऱ्या गोदरेज समूहाने मुंबईच्या रिअल इस्टेटमध्येही मोठा ठसा उमटवला आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाली या संपत्तीची कहाणी

गोदरेज समूहाच्या या प्रचंड जमीन मालकीमागे अनेक दशकांचा इतिहास आहे. गोदरेज इंडस्ट्रीजचे चेअरमन आदि गोदरेज यांचे आजोबा आणि समूहाचे दूरदर्शी संस्थापक पिरोजशा बुर्जोरजी गोदरेज यांनी त्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जमिनींच्या किमती आणि तेव्हाच्या आर्थिक परिस्थितीचा अचूक अंदाज घेतला आणि मोठी जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

त्या काळात तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून मुंबईतील सुमारे 3,000 एकर जमीन 30 लाख रुपयांना खरेदी करण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आणखी 400 एकर जमीन खरेदी करण्यात आली. अशा प्रकारे गोदरेज कुटुंबाची जमीन मालकी सुमारे 3,400 एकरांपर्यंत पोहोचली. आजच्या काळात या जमिनीची किंमत किती प्रचंड असू शकते, याचा अंदाज यावरूनच येतो.

विक्रोळीतील जमीनीची किंमत हजारो कोटींच्या पुढे

गोदरेजच्या या विशाल जमीनमालकीतील सुमारे 1,800 एकर भागात मॅन्ग्रोव्ह म्हणजेच कांदळवन क्षेत्र असल्याचं सांगितलं जातं. पर्यावरणीय नियमांमुळे अशा भागात बांधकामाला मोठे निर्बंध आहेत. मात्र, असं असलं तरीही विक्रोळी परिसरातील सुमारे 1,000 एकर विकासयोग्य जमिनीला प्रचंड बाजारमूल्य असल्याचं म्हटलं जातं. . काही अंदाजांनुसार, या जमिनीची किंमत तब्बल 4.35 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक असू शकते. विशेष म्हणजे, हा आकडा गोदरेज समूहाच्या शेअर बाजारात लिस्टेड चार कंपन्यांच्या एकत्रित बाजारमूल्याच्या तुलनेतही अनेक पटींनी मोठा आहे, असा दावा केला जातो.

मुंबईपुरती मर्यादित नाही गोदरेजची रिअल इस्टेट ताकद

गोदरेज कुटुंबाची रिअल इस्टेटमधील उपस्थिती केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या देशातील प्रमुख महानगरांमध्येही समूहाकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि विकासासाठी महत्त्वाच्या मालमत्ता आहेत. गोदरेज समूहाची रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज या जमिनींच्या माध्यमातून निवासी प्रकल्प, आलिशान सोसायट्या आणि आधुनिक कमर्शियल कॉम्प्लेस देखील विकसित करते. त्यामुळेच ती देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक मानली जाते.

 

Follow Us