
जगभरात काल रात्री सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे झोकात स्वागत करण्यात आलं. कोणी घरीच कुटुंबियांसोबत तर कोणी मित्र-मैत्रिणींसोबत जोरदार पार्टी करत नव्या वर्षाचं स्वागत केलं. जगात विविध ठिकाणी न्यू ईअर सेलिब्रेशनचे विविध पद्धतीने स्वागत करण्याची पद्धत असते. मात्र न्यू ईअर सेलिब्रेट करणं, जानेवारीतच नव्या वर्षाची सुरू वाच करणं हे कसं, कधी आणि कुठे सुरू झालं हे माहीत आहे का ? English (Gregorian) कॅलेंडर नुसार, ही परंपरा कशी आणि कधी सुरू झाली ते जाणून घेऊया.
जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्टस :
1) कशी सुरू झाली परंपरा ?
नवीन वर्ष साजरं करण्याची परंपरा प्राचीन रोममध्ये रुजली आहे. सर्वात पहिला संघटित नवीन वर्षाचा उत्सव रोमन लोकांनी इ.स.पूर्व 153 च्या सुमारास सुरू केला होता. त्या वेळी, 1 जानेवारी हा दिवस नवीन वर्षाची सुरूवात मानला जात असे कारण या दिवशी Roman Consuls (सरकारी अधिकारी) त्यांचे पदभार स्वीकारायचे.
2) जानेवारी नाव कसं पडलं ?
Roman God “Janus” यावरून जानेवारी महिन्याचं नाव घेतलं आहे. Janus हा सुरूवात आणि अंत यांचा देव, तसेच भूतकाळ आणि भविष्य जाणणारा देव मानला जात असे. Janus ची दोन मुखं होती, एक मागे (Past) आणि एक पुढे (Future). याचचं प्रतीक म्हणून नव्या आरंभासाठी 1 जानेवारीची निवड झाली.
3) Julian Calendar आणि New Year
ईसपूर्व 46 मध्ये, ज्युलियस सीझरने ज्युलियन कॅलेंडर लागू केले. 1 जानेवारी हा दिवस अधिकृतपणे नवीन वर्ष म्हणून घोषित करण्यात आला. रोमन साम्राज्याचा विस्तार होत असताना ही परंपरा युरोपमध्ये पसरली.
4) मध्ययुगातील बदल
मध्ययुगात, ख्रिश्चन चर्चने 25 मार्च, इस्टर इत्यादी वेगवेगळ्या तारखांना नवीन वर्ष साजरे करण्यास सुरुवात केली. म्हणूनच, वेगवेगळ्या युरोपीय देशांमध्ये वेगवेगळ्या नवीन वर्षाच्या तारखा लोकप्रिय झाल्या.
5) Gregorian Calendar आणि आजचं New Year
१५८२ मध्ये, पोप ग्रेगरी XIII यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर लागू केलं. तेव्हा 1 जानेवारी हा दिवस नवीन वर्षाचा दिवस म्हणून पुन्हा घोषित करण्यात आला. हळूहळू, युरोप आणि नंतर संपूर्ण जगाने हे कॅलेंडर स्वीकारले.
6) भारतीय चित्रपटांत New Year Celebration
राज कपूर आणि देव आनंद यांच्या काळातील चित्रपटांमध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या आणि पाश्चात्य संस्कृती दिसू लागली. 1960 च्या सुमारास, हिंदी चित्रपटांमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन हे शहरी उत्सव म्हणून दाखवलं जाऊ लागलं.
भारतीय संस्कृतीत, वैज्ञानिक आधार आणि निसर्गातील बदलांनुसार, येणारे नवीन वर्ष काही ठिकाणी चैत्र प्रतिपदा म्हणून, काही ठिकाणी बैसाखी म्हणून, काही ठिकाणी उगादी म्हणून तर काही ठिकाणी वर्षाच्या इतर वेळी पोयला बैशाख (Poila Boishakh)म्हणून साजरे केले जाते. हा असा काळ आहे जेव्हा निसर्गात आणि ग्रहांच्या हालचालीत खरा बदल होत असतो, त्याचा थेट परिणाम पृथ्वीवरील प्रत्येक सजीवावर होतो, केवळ भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरमध्ये बदल होत नाही.