Snake Fact: हिवाळ्याची चाहुल लागताच साप कुठे होतो गायब? दिवसा की झोपतात रात्री? वाचलीच नसेल अशी रंजक माहिती
Snake Fact: उन्हाळा आणि पावसाळ्यात सापाचे घराच्या आजूबाजूला, शेतात दर्शन घडते. पण हिवाळा सुरू होताच साप अचानक गायब होतात. हिवाळ्याची चाहुल लागताच साप कुठे होतो गायब?

Snake Winter Facts: उन्हाळा आणि पावसाळा आला की सापाचे कुठे न कुठे दर्शन होते. पावसाळ्यात पाणी बिळात शिरल्याने साप बाहेर पडतात. त्यामुळे ते शेतात सहज वावरताना दिसतात. पण हिवाळा सुरू झाला आणि थंडी पडायला लागली की साप अचानक कुठे गायब होतो असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण सापाचे शेतात वा बगीच्यात सहजासहजी दर्शन होत नाही. थंडीच्या दिवसात केवळ थंडीच नाही तर इतर अनेक कारणामुळे साप अचानक गायब होतो.
रक्त गोठण्याच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी आसरा
साप हा शीत रक्ताचा प्राणी आहे. साप हा स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतःहून नियंत्रित करू शकत नाही. जेव्हा वातावरण अति थंड होते. तेव्हा त्याचे रक्त गोठण्याची भीती कायम असते. अशावेळी त्यांना साधी हालचाल करणेही कठीण होते. थंडीत सापाची चयापचय प्रक्रिया मंदावते. त्याच्या शरीरातील ऊर्जा निर्माण होणे बंद होते. भूक लागलेली असली तरी शारीरिक हालचाल करता येत नसल्याने तो शिकार करू शकत नाही. अशावेळी लवकर शिकार न मिळाल्यास त्याचा मृत्यू सुद्धा ओढू शकतो. अशावेळी सापाची मानसिक स्थिती विचित्र होते. तो चिडचिड करतो आणि आक्रमक होतो. त्यामुळे अशावेळी चुकून त्याला जर धक्का लागला तर तो आक्रमकपणे हल्ला करतो. दंश करतो.
पोटोबा झाल्यानंतर शीतनिद्रा
हिवाळ्यापूर्वीच साप हा त्याच्या शिकारीची तजवीज करून ठेवतो. हे अन्नच त्याला हिवाळा सरेपर्यंत, संपेपर्यंत त्याला पुरेसे ठरते. अस्वल आणि इतर काही प्राण्यांप्रमाणेच सापही सुरक्षित आणि उबदार कोपरा शोधतो. अडगळीतील जागा, कडबा ठेवलेल्या जागा अथवा दुर्लक्षित जागी तो आश्रय घेतो. हिवाळ्यात साप अनेक तास ढाराढूर झोपेत असतात. साप या काळात पूर्वी केलेल्या शिकारीच्या ऊर्जेवर जगतात. ऊर्जा टाळण्यासाठी ते हालचाल टाळतात. यामुळेच साप हिवाळ्यात सहजासहजी कुणाला दिसत नाहीत. थंडी ओसरू लागली आणि ऊब जाणवू लागली की साप पुन्हा चपळाई दाखवतो.