
कोविड-19 च्या काळात ऑनलाइन शिक्षणाकडे झालेल्या बदलामुळे मुलांच्या लिहिण्याच्या, वाचण्याच्या आणि विचार करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. कोरोना काळात शाळा बंद झाल्यावर मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागला, तेव्हा ऑनलाइन वर्ग हा एकमेव पर्याय बनला. पण आता समोर आलेले परिणाम चिंताजनक आहेत. एका संशोधनानुसार, ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांची बौद्धिक क्षमता मंदावली आहे. त्यांची विचार करण्याची, लिहिण्याची आणि समजून घेण्याची ताकद आधीपेक्षा कमी झाली आहे.
संशोधन काय सांगते?
संशोधनासाठी आठवी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या अभ्यासात असे दिसून आले की या मुलांची लेखनशैली, वाचनाची क्षमता, विषय समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची ताकद आधीपेक्षा कमकुवत झाली आहे. जी मुले आधी सहज 300 – 400 शब्द लिहू शकत होती, ती आता 100 – 150 शब्दांतच थकून जातात.
एका विद्यार्थिनीने सांगितले की, ती आता आधीसारखं वाचू शकत नाही. जास्त वेळ लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आहे. लिहिण्याचा कंटाळा येतो आणि शब्द लक्षात ठेवण्याची शक्तीही कमकुवत झाली आहे. तिने हेही सांगितले की, जेव्हापासून ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत, तेव्हापासून तिला विषय समजून घेण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत आहे.
दुसऱ्या एका केसमध्ये, बारावीच्या विद्यार्थ्याने सांगितले की, ऑनलाइन शिक्षण सुरू असताना त्याचं लक्ष मोबाईल आणि सोशल मीडियाकडे जास्त जात होतं. आजही तो पुस्तकांमध्ये जास्त वेळ घालवू शकत नाही. मोठे उत्तर लिहिणे आणि सखोल विचार करणे त्याच्यासाठी एक आव्हान बनले आहे.
थोडक्यात, ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना तांत्रिकदृष्ट्या मदत झाली असली, तरी त्यांच्या बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक विकासावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. आता ऑफलाइन शिक्षण पुन्हा सुरू झाले असले तरी, शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना पुन्हा लिहिण्याचा, वाचण्याचा आणि विचार करण्याचा सराव करून देणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांची हरवलेली बौद्धिक क्षमता परत मिळवता येईल.