“कौन बनेगा करोडपती”च्या नावाखाली 3 लाख रुपयांची फसवणूक

| Updated on: Sep 18, 2019 | 10:02 PM

'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा कार्यक्रम सर्वांच्याच आवडीचा आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या नावाखाली 3 लाख रुपयांची फसवणूक
Follow us on

नालासोपारा : ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) हा कार्यक्रम सर्वांच्याच आवडीचा आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम पाहून प्रत्येकाला करोडपती होण्याची इच्छा होते. मात्र याच कार्यक्रमाच्या नावाखाली सध्या लोकांची फसवणूक केली जात आहे. केबीसीच्या (KBC) नावाखाली नालासोपाऱ्यातील एका तरुणाला तब्बल तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

खोट्या नाट्या जाहिराती, व्हिडीओ बनवून, कौन बनेगा करोड पतीची (Kaun Banega Crorepati) तुम्हाला लॉटरी लागली आहे. तुम्हाला 25 लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला जीएसटी आणि इतर टॅक्स भरावा लागणार आहे, असं फोन करुन सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणारी मोठी टोळी आता सक्रिय झाली आहे.

अशाच एका टोळीने सध्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 15 वर्षीय तरुणाची फसवणूक केली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहार राज्यातील दरभंगा येथे राहणारा 15 वर्षाचा मनीष देवेंद्र हा सध्या नालासोपारा येथे आपल्या नातेवाईकांकडे राहतो. 1 ऑगस्ट रोजी या तरुणाला एका अनोळखी इसमाचा फोन आला, त्या फोनवरुन त्याला कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून 25 लाखांचा जॅकपॉट लागला आहे. त्यासाठी तुम्हाला 25 हजार भरावे लागतील. ही घटना तरुणाने आपल्या आईला सांगितली आणि त्यांनी दिलेल्या बँक खात्यात त्याने पैसे पाठवले.

त्यानंतर पुन्हा त्याला 1 सप्टेंबर रोजी फोन आला आणि जीएसटी आणि इतर प्रोसेसिंग फीसाठी 60 हजार रुपये भरण्यास सांगितले. तेही त्याने भरले. काही पैसे त्याने आपल्या गावातून भरले. असे करत या टोळीने लॉटरीच्या नावाखाली त्याच्याकडून जवळपास 3 लाख 92 हजार रुपये उकळले.

पैसे भरल्यानंतरही 25 लाख मिळत नसल्याने त्याने आलेल्या नंबरवर संपर्क केला. पण समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

टीव्ही कार्यक्रमाच्या नावाखाली नागरिकांना फोन करुन पैशाचे अमिष दाखवले जाते. त्यात नागरिकांची फसवणूक होते. त्यामुळे प्रत्येकाने असे फोन आल्यास सावध राहा, असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.