नांदेडमध्ये जेलमध्ये 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पोलिसांची जबर मारहाण?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नांदेड : हदगाव पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 60 वर्षीय हरिसिंग राठोड यांचा मृत्यू झाला. गुरुवारी ही खळबजनक घटना घडली. दरम्यान हरीसिंग यांना पोलिसांनी जबर मारहाण केली, त्यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे हदगाव शहरात सध्या प्रचंड तणाव आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हदगाव शहरात बंदोबस्तात वाढ केली आहे. हरिसिंग यांचं घर अतिक्रमण भागात […]

नांदेडमध्ये जेलमध्ये 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पोलिसांची जबर मारहाण?
Follow us on

नांदेड : हदगाव पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 60 वर्षीय हरिसिंग राठोड यांचा मृत्यू झाला. गुरुवारी ही खळबजनक घटना घडली. दरम्यान हरीसिंग यांना पोलिसांनी जबर मारहाण केली, त्यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे हदगाव शहरात सध्या प्रचंड तणाव आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हदगाव शहरात बंदोबस्तात वाढ केली आहे.

हरिसिंग यांचं घर अतिक्रमण भागात असल्याचे सांगत, त्यांचे घर पाडलं जात होते. त्याला हरिसिंग यांनी विरोध केला. त्यामुळे शासकीय कामात अडथडा आणल्याप्रकरणी पोलिसांनी हरिसिंग राठोड यांना अटक केली होती. हदगाव मार्केट कमिटीच्या जागेवर हरिसिंग यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. त्या जागेवर हरिसिंग यांनी घर देखील बांधलं होतं. मार्केट कमेटीने गुरुवारी पोलिसांच्या मदतीने हरिसिंग राठोड यांचे घर जेसीबी लावून पाडले. अतिक्रमण असल्याने ही कारवाई केल्याचे मार्केट कमिटीच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. याच कारवाईला हरिसिंग यांनी विरोध केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी सांगितले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र पोलिसांचा हा दावा खोडून काढला. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हरिसिंग यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, असे डॉक्टर अनिल पावडे यांनी सांगितले.

दरम्यान, हरिसिंग यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांच्या मारहाणीत हरिसिंग राठोड यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणं आहे. मार्केट कमिटीच्या अध्यक्षाच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला. प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली.

या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने या प्रकरणी सीआयडी मार्फत चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. पोलिस अधिकाऱ्यांनी सीआयडीकडे तपास देण्याचं आश्वासन दिल्याने हे प्रकरण शांत झालं आहे. मात्र, या घटनेत राजकीय दबाव असल्याचे उघड होत असून पोलिस त्या दबावाखाली आल्याचे दिसत आहे. त्यामुळे सीआयडी तपासात काय निष्पन्न होते आहे, ते पाहणं महत्त्वाचे ठरेल.