नांदेडसाठी शनिवार ठरला घातवार, एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू

| Updated on: Feb 22, 2020 | 10:51 PM

दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाणा वाढत असतानाच नांदेडसाठी आजचा शनिवार (22 फेब्रुवारी) घातवार ठरला आहे.

नांदेडसाठी शनिवार ठरला घातवार, एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू
Follow us on

नांदेड : दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाणा वाढत असतानाच नांदेडसाठी आजचा शनिवार (22 फेब्रुवारी) घातवार ठरला आहे (Many People died in Nanded in one day). नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाच दिवशी एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय. यातील सातही मृत्यू अपघाती स्वरूपाचे आहेत. भरीस भर म्हणून शनिवारी सायंकाळी नांदेडमध्ये एका अनोळखी व्यक्तीने गोदावरी नदीत उडी मारून जीव दिल्याने मृतांचा आकडा आठवर गेला.

नांदेड-गाडेगाव रस्त्यावर एका भरधाव ट्रकने रात्री उशिराच्या सुमारास दुचाकीला धडक दिली. आसना बायपासजवळ हा अपघात झाला. ट्रकच्या धडकेत शिवराज उबाळे हा युवक ठार झाला. मृत शिवराज विवाहित होता. त्याला दोन मुलंही आहेत. घरातील एकुलता एका मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने उबाळे कुटुंबावर संकट कोसळलं आहे.

यानंतर सकाळी नायगाव तालुक्यात एक अपघात झाल्याची बातमी आली. इकळीमाळ ते कुंटूर गावादरम्यान ही घटना घडली. रेतीच्या डिप्परच्या धडकेत सुरज बोधके या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं. तहसीलदारांनी मध्यस्ती केल्यानं आंदोलक शांत झालं. यातील मृत सुरज आजोबांसोबत गाडीवर शेताकडे निघाला होता. या अपघातात त्याचे आजोबा देखील गंभीर जखमी झाले आहेत.

रस्त्याच्या या अपघाताच्या दोन घटनांनंतर मुखेड तालुक्यातील जाम्ब गावातून एक अपघाताची बातमी धडकली. पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्याच्या पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील जांब गावाजवळ ही घटना घडली. येथे रस्त्याचं काम सुरू असून रस्त्याच्या कडेलाच पुलासाठी मोठा खड्डा खोदला होता. दोन्ही मुलं शेताकडे जात असताना त्यांचा पाय घसरून ते खड्ड्यात पडले. त्यात 12 वर्षीय माधव सगर आणि ज्ञानेश्वर पुरगुलवाडचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ही दोन्ही मुले सलगच्या सुट्ट्यांमुळे आपल्या आजोळच्या जाम्ब गावात आले होते. मात्र, त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे जाम्ब गावावर शोककळा पसरली. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारानं योग्य ती काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातून गावकऱ्यांनी रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

या घटनेनंतर पिता-पुत्राचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोहा शहरानजीक देवणेवाडी गावात घडली. लोहा शहरापासून अवघ्या 4 किमी अंतरावरील देवणेवाडी येथील शेतकरी हनुमंत चौकले यांची देवणेवाडी शिवारात गावालगत शेती आहे. कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असल्याने चौकले कुटुंब सध्या शेत शिवारात राबत आहे. रब्बी पीकाची पक्षी आणि वन्य जीवांपासून राखण करण्यासाठी सकाळपासूनच चौकले पिता-पुत्र शेताकडे होते.

हनुमंत चौकले यांचा 15 वर्षीय मुलगा शिवानंद हनुमंत चौकले हा जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेला. विहिरीला कठडे नसल्याने पाय घसरून शिवानंद विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडत होता ते पाहून पुत्र प्रेमापोटी जवळच असलेला पिता हनुमंत माधवराव चौकले यांनी मुलाला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र पित्यालाही पोहता येत नव्हते. पुत्राने पित्याच्या गळ्याभोवती घट्ट मिठी मारली. त्यात ते दोघेही बुडत असल्याचे बाजूला उभे असलेल्या एक मुलाने पाहून आरडा-ओरड केला. हा प्रकार पाहिलेल्या मुलाने जवळच असलेल्या तांड्यावर जाऊन सदरील घटनेची माहिती सांगितली. तेथील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतू, तोपर्यंत दोघेही पिता-पुत्रांचा मृत्यू झाला होता.

शनिवार संपत असताना पुन्हा एक घटना घडली. कंधार तालुक्यातील घोडज गावाजवळ मन्याड नदीत 3 मित्र पोहण्यासाठी गेले होते. ओम मठपती, गजानन श्रीमंगले आणि आदित्य डुंडे असं या तिघांचं नाव होतं. ते पोहण्यासाठी नदीत उतरले, मात्र या तिघांना नीट पोहता येत नव्हतं. ते बुडत असताना कामेश्वर वाघमारे या मुलाने पाहिलं. कामेश्वरने जीवाची बाजी लावत गजानन आणि आदित्यला वाचवलं. मात्र, यावेळी ओम मठपती या मुलाचा मृत्यू झाला. मृत ओम हा कंधार शहरातील रहिवाशी होता. तो दहावीत शिकत होता.

Many People died in Nanded in one day