औरंगाबादच्या व्हेरॉक पॉलिमरविरोधात उपोषण सुरूच, 48 कामगारांना कामावर घेण्याची मागणी

| Updated on: Nov 13, 2021 | 4:46 PM

कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने औरंगाबाद मजदूर युनियन सीटू ही युनियन लावली होती. याचा राग म्हणून कारखान्याच्या व्यवस्थापनाने कोरोनाचे कारण पुढे करत तब्बल 48 कामगारांना कमी केले आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

औरंगाबादच्या व्हेरॉक पॉलिमरविरोधात उपोषण सुरूच, 48 कामगारांना कामावर घेण्याची मागणी
पैठण येथील व्हेरॉक कंपनीसमोर कामगारांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण
Follow us on

औरंगाबादः पैठण तालुक्यातील फारोळा येथील व्हेरॉक पॉलिमर प्रा. लिमिटेड (Varroc Polymers)  कंपनीविरोधात कर्चमाऱ्यांचे आंदोलन (Workers Agitation) आज दुसऱ्या दिवशीदेखील सुरुच आहे. कंपनीने 48 कामगारांना कामावरून कमी केले आहे. मात्र त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी 12 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारपासून आंदोलन सुरु केले आहे. आज शनिवारीदेखील हे आंदोलन सुरुच आहे.

48 कुटुंबांवर उपासमारीची वेळ

व्हेरॉक पॉलिमर प्रा. लिमिटेड कंपनी ही फारोळा, पैठण येथे आहे. येथील 48 कामगारांनी जानेवारी 2020 मध्ये औरंगाबाद मजदूर युनियनचे सदस्यत्व मिवले. त्यामुळे कारखान्याच्या व्यवस्थापकांनी या कामगारांना 1 फेब्रुवारी 2020 पासून काम देणे बंद केले. मार्च 2020 मध्ये सर्व 48 कामगारांना कामावरून कमी केले. त्यामुळे सर्वांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी व्यथा येथील कामगारांनी मांडली.

व्यवस्थापनाची कारवाई, कोरोनाचे कारण

या कारखान्यातील 48 कामगार जवळपास 12 वर्षांपासून कारखान्यात काम करतात. दोन वर्षांपूर्वी या कारखान्यातील कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने औरंगाबाद मजदूर युनियन सीटू ही युनियन लावली होती. याचा राग म्हणून कारखान्याच्या व्यवस्थापनाने कोरोनाचे कारण पुढे करत तब्बल 48 कामगारांना कमी केले आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कामगारांवर कंपनी व्यवस्थापनाने अन्याय केल्याची भावना बिडकीन येथील अनेक राजकीय मंडळींनी व्यक्त करत उपोषण कर्त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

मंत्री संदीपान भूमरे यांनी लक्ष घालण्याची मागणी

औरंगाबाद, बिडकीन पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊन शुक्रवारपासून कंपनीसमोर कामगारांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशीदेखील हे उपोषण सुरूच होते. रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

इतर बातम्या- 

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप; दीड वर्षापर्यंत दररोज मोफत 6 जीबी इंटरनेट डेटाही

Video | जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली