प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

अहमदनगर : प्रेयसी व्यवस्थित वागत नाही, म्हणून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. इतकेच नाही तर प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराने आत्महत्या करत स्वत:चंही जीवन संपवलं. अहमदनगरच्या श्रीरामपूर परिसरात हा हत्या आणि आत्महत्येचा प्रकार घडला. विशेष म्हणजे हे प्रेमी युगुल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

निता गोर्डे (वय 40) आणि गणेश दळवी (वय 30) यांच्यात प्रेम संबंध होते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील वार्डक्रमांक 1 मध्ये अडसुळ गल्ली येथे हे प्रेमी युगुल भाड्याने राहात होते. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. एक महिन्यापूर्वी त्यांनी विवाह केल्याचंही बोललं जात आहे.

शनिवारी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन गल्लीतच वाद झाला. त्यानंतर ते दोघेही घरात गेले, तेव्हाही त्यांचं भांडण सुरुच होतं. त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. मात्र काही वेळाने त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येणं अचानक थांबलं. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी घरात डोकावून बघितलं, तेव्हा हे प्रेमी जोडपं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं दिसलं. हे दृष्य बघताचं शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या प्रेमी युगुलाचे भांडण एवढ्या विकोपाला गेले की, गणेशने नितावर चाकूने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वरही चाकूने वार करत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. निता गणेशसोबत व्यवस्थित वागत नसल्याने त्यांच्यात भांडण झालं आणि त्यातून ही हत्या आणि आत्महत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI