भल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश

| Updated on: Oct 17, 2020 | 2:20 PM

बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली.Ajit Pawar visit to Baramati

भल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पहाटेच्यावेळीच अनेक भागांना भेटी देताना दिसत आहेत. बारामतीमध्येही अजितदादांनी तोच कित्ता गिरवला.
Follow us on

बारामती: बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (Ajit Pawar visit to Baramati flood affeccted area and orders to officers prepare report of damage during flood)

सोलापूर आणि इंदापूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजित पवारांच्या दौऱ्यानंतर तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 7 वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भिगवण रस्त्यावरील अमरदीप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हानदीवरील खंडोबा नगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पाहणी केली.

अजित पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पुढील काळात पूरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना.

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज-अंजणगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करुन याठिकाणची वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या : 

ईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार; अजित पवार पुन्हा गोत्यात?

अजित पवारांच्या मनमानीमुळे सिंचन घोटाळा, प्रस्ताव मंजुरीचे परिपत्रकच रद्द केले

(Ajit Pawar visit to Baramati flood affeccted area and orders to officers prepare report of damage during flood)