आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली

| Updated on: Oct 31, 2019 | 10:25 AM

अक्कलकोट-महाड एसटी बसला बुधवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास आंबेनळी घाटात अपघात झाला.

आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली
Follow us on

रायगड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात पुन्हा एकदा बस कोसळून भीषण अपघात (Ambenali Ghat Bus Accident) झाला आहे. या अपघातामध्ये बसमधील 58 प्रवाशांपैकी 27 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वर्षभरापूर्वी आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

आंबेनळी घाटातील दरीत एसटी बस कोसळून 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सात जखमींना महाडला हलवण्यात आलं आहे.

अक्कलकोट-महाड (एमएच 20 बीएल 3236) या गाडीला काल (बुधवारी) रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास अपघात झाला. पायटे गावाजवळ समोरुन येणाऱ्या गाडीला साईड देताना एसटी बस 200 फूट खोल दरीला असलेल्या एका संरक्षण कठड्यावर धडकली.

ही धडक इतकी जबरदस्त होती, की कठडा तुटून बस जवळपास 30 फुटांपर्यंत खाली घसरली. मात्र झाडीत अडकल्यामुळे सुदैवाने बस थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

बसमध्ये वाहक, चालक यांच्यासह एकूण 58 प्रवासी असल्याची माहिती आहे. अपघात झाल्याची माहिती समजताच दीड किलोमीटरवर असलेल्या पायटेवाडीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बसमधून बाहेर काढलं.

‘त्या’ अपघाताच्या आठवणी ताज्या

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी पावसाळी सहलीनिमित्त महाबळेश्वरला निघाले होते. त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळून (Ambenali Ghat Bus Accident) 31 पैकी 30 जण जागीच मृत्युमुखी पडले होते.

सहलीसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही बस महाबळेश्वरच्या दिशेने जात होती. साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली. या अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. बसमधील 31 पैकी 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रकाश सावंत देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले.

प्रकाश सावंत देसाई हे खोल दरीतून वर आले आणि त्यांनी मोबाइलवरुन विद्यापीठातील अधिकाऱ्यांना बस अपघाताची माहिती दिली. त्यानंतर देसाईच अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप बहुसंख्य मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

संबंधित बातम्या  

आंबेनळी घाट दुर्घटनेप्रकरणी पहिला गुन्हा दाखल  

अंबेनळी बस अपघात : प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्यासाठी दापोलीकर आक्रमक