भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर परिणाम भोगा, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर परिणाम भोगा, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

वॉशिंग्टन : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकटं पाडण्याची जी मोहिम सुरु केली होती, त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय. पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा एकदा सज्जड दम दिला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी. भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानवर संकट येईल, असा सूचक इशारा व्हाईट हाऊसने (अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय) दिला आहे.

पाकिस्तानने जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांवर सातत्याने कारवाई करण्याची गरज आहे. पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने दिली.

पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही आणि भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला, तर पाकिस्तानसाठी मोठी अडचण निर्माण होईल. यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण होईल आणि दोन्ही देशांसाठी हे धोकादायक असेल, अशी भीतीही अमेरिकेकडून वर्तवण्यात आली.

पाकिस्तानने बालाकोट एअर स्ट्राईकला दिलेल्या प्रत्युत्तरावरही अमेरिकेने स्पष्टीकरण दिलं. कारण, यामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद संपवण्यासाठी दिलेल्या एफ-16 या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानने जी कारवाई केली, त्याबाबत आकलन सुरु असून आत्ता प्रतिक्रिया देणं घाईचं ठरेल. पाकिस्तानने काही सुरुवातीची पाऊलं उचलली आहेत. परिणामी पाकिस्तानकडून काही दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, तर काहींना अटकही झाली आहे. शिवाय जैशच्या काही ठिकणांना प्रशासनाने ताब्यात घेतलंय, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. याव्यतिरिक्त पाकिस्तानला अजून बरंच काही करण्याची गरज असल्याचंही अमेरिकेने म्हटलंय.

14 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये घुसून एक हजार किलोचा बॉम्ब टाकला होता, ज्यात जैशचे प्रशिक्षण तळं उद्ध्वस्त केल्याचा दावा भारतीय वायूसेनेने केला. यानंतर पाकिस्तानकडूनही पुढच्याच दिवशी उत्तर देत भारतीय वायूसीमेत घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता.

Published On - 11:33 am, Thu, 21 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI