प्रज्ञा ठाकूर, नथुराम गोडसे ते मॉब लिंचिंग, प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांची अमित शाहांवर प्रश्नांची सरबत्ती

| Updated on: Dec 01, 2019 | 6:52 PM

रोखठोक विचारांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधी हत्येपासून तर मॉब लिचिंगपर्यंत अनेक अवघड प्रश्न केले आहेत (Rahul Bajaj question Amit Shah on Pradnya Thakur).

प्रज्ञा ठाकूर, नथुराम गोडसे ते मॉब लिंचिंग, प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांची अमित शाहांवर प्रश्नांची सरबत्ती
Follow us on

नवी दिल्ली : रोखठोक विचारांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधी हत्येपासून तर मॉब लिचिंगपर्यंत अनेक अवघड प्रश्न केले आहेत (Rahul Bajaj question Amit Shah on Pradnya Thakur). इकॉनॉमिक टाईम्स पुरस्कार सोहळ्यातील चर्चा सत्रात त्यांनी शाह यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्तीच केली. सध्या त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. बजाज यांनी विचारलेल्या या रोखठोक प्रश्नांसाठी आणि स्पष्टवक्तेपणाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे (Rahul Bajaj question Amit Shah on Pradnya Thakur).

या कार्यक्रमात अनेक उद्योजक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच राहुल बजाज म्हणाले, “माझे काळजीचे मुद्दे अगदी छोटेसे आहेत. आज संसदेत असणारे कुणालाही देशभक्त बोलत आहेत. ज्यांनी गांधींवर गोळी झाडून त्यांची हत्या केली त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे. त्यात काही शंका आहे का? भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आधीच महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणाल्या होत्या. तरीही त्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट देण्यात आलं. त्या निवडणुकीत जिंकल्या हे तर ठिक आहे. मात्र, त्या तुमच्या (भाजपच्या) पाठिंब्यावरच जिंकल्या आहेत. त्यांना कुणी ओळखतही नव्हतं. तरीही तिकीट देण्यात आलं. त्यानंतर तुम्ही त्यांना संसदीय समितीतही स्थान दिलं.”

काँग्रेसने देखील राहुल बजाज यांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांचे कौतुक केलं आहे.

“मोदींनी माफ करु शकणार नाही म्हणूनही प्रज्ञा सिंह ठाकूरला संसदीय समितीत जागा”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला देशभक्त म्हटलं त्यांना माफ करु शकणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतरही असं म्हणणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना संसदीय समितीत जागा देण्यात आली, असा आक्षेप राहुल बजाज यांनी नोंदवला. तसेच यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांना त्या समितीतून हटवण्यात आलं आणि या छोट्याश्या अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही असं सांगितलं ते ठिक आहे, असंही नमूद केलं.

“मी तुम्हाला प्रश्न न विचारण्याचा विचार करत होतो. कारण माझ्यासाठी कुणाचीही नसती स्तुती करणं कठीण काम आहे. माझी वाढच त्या पद्धतीने झाली नाही. मी नेहमीच गरिबांच्या बाजूने राहिलो आहे. माझे आजोबा महात्मा गांधींचे मानलेले पुत्र होते. तुम्हाला आवडणार नाही, मात्र मला राहुल हे नाव पंडित जवाहरलाल नेहरुंनी दिलं होतं. मी जन्मतःच सत्ताविरोधी राहिलो आहे. मग ते सरकार संयुक्त पुरोगामी सरकारचं (युपीए) असो किंवा इतर कोणतंही सरकार असो.”

“देशात एक भीतीचं आणि असहिष्णुतेचं वातावरण”

देशात भीतीचं वातावरण असल्याचा आणि असहिष्णुता वाढल्याचा मुद्दाही बजाज यांनी उपस्थित केला. राहुल बजाज म्हणाले, “एक वातावरण तयार झालं आहे. ते काही दहशतीचं आहे असं नाही. जग चूक आहे की बरोबर आहे हाही येथे मुद्दा नाही. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मॉब लिंचिंग हा परदेशी शब्द आहे असं म्हणतात. पश्चिमेत लिंचिंग होत होती. आपल्याला त्याचा अर्थ माहिती आहे.”

छोट्या घटना घडत आहेत. मात्र, त्याचं एक वातावरण तयार होत आहे. असहिष्णुतेचं वातावरण आहे. आम्ही घाबरतो, त्यावर घाबरणं आमची चूक आहे असंही कोणी म्हणेल. मात्र, मला काही गोष्टी बोलायच्या नव्हत्या, त्या म्हणजे मॉब लिंचिंगच्या प्रकरणांमध्ये कोणीही दोषीच सिद्ध झालेलं नाही. बलात्कार नाही, दरोडा नाही, खून नाही. पांढरपेशी गुन्हे खूप वाईट, पॉकेट मारणे ठिक आहे. हजारो कोटींचा घोटाळा चूक आहे. मात्र, दोषी सिद्ध न होताच काही लोक 100 दिवस तुरुंगात राहतात. मी त्यांना पाठिंबा देत नाही. खरंतर मी त्या व्यक्तींना ओळखत देखील नाही, असंही बजाज यांनी नमूद केलं.

“मी आत्तापर्यंतच्या 40-50 वर्षांमध्ये कोणत्याही मंत्र्याला मी ऑफिसमध्ये किंवा घरी भेटलो नाही, काही विचारलं नाही. पियुष गोयल येथे आहेत. त्यांनाही हे चांगलं माहिती आहे. कारण माझी मुलं काम करतात. देवाची माझ्यावर कृपा आहे. मी जे श्रेय घेऊ शकतो ते म्हणजे या दोन्ही मुलांना मी व्यवसाय सांभाळण्याचा पूर्ण अधिकार दिला.”

“युपीए-2 च्या काळात आम्ही कुणावरही टीका करु शकायचो, आज तो विश्वास नाही”

राहुल बजाज म्हणाले, “आज हे जे एक वातावरण आहे हे आमच्या मनात नक्की आहे. कुणीही याविषयी बोलणार नाही. आमच्या उद्योग जगतात कुणीही उद्योजक बोलणार नाही. मी हे अगदी सार्वजनिकपणे सांगू शकतो. मात्र, मला एका चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. फक्त नाकारणे पुरेसे नाही. मी काही आज बोलायचं म्हणून बोलत नाही. एक वातावरण तयार करावं लागेल. युपीए-2 च्या काळात आम्ही कुणावरही टीका करु शकायचो. मात्र, आज तुम्ही चांगलं काम करत आहात. त्यानंतरही आम्ही तुमची खुलेपणाने चिकित्सा करु आणि तुम्ही ती स्वीकाराल हा विश्वासच येत नाही.”

मी चुकीचाही असू शकेल. तरीही ठिक आहे. मात्र, आम्हाला सर्वांना वाटतं की हे भीतीचं वातावरण आहे. मी सर्वांच्यावतीने नाही बोलू शकत. पण चढ आता सुळावर असं म्हणत लोक माझ्यावर हसतायेत, असंही बजाज यांनी म्हटलं.