Bigg Boss Marathi 2 | कोण जिंकणार ‘बिग बॉस’ची ट्रॉफी? सोशल मीडियावर विजेता ठरला

| Updated on: Aug 31, 2019 | 1:17 PM

विविध मनोरंजन वाहिन्या आणि वेबसाईट्सनी सोशल मीडियावर आपापले पोल्स घेतले आहेत. बहुतांश पोल्समध्ये प्रेक्षकांनी बहुमताने शिव ठाकरेला आपली पसंती दिली आहे.

Bigg Boss Marathi 2 | कोण जिंकणार बिग बॉसची ट्रॉफी? सोशल मीडियावर विजेता ठरला
Follow us on

Bigg Boss Marathi 2 मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 2) च्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार? हे ठरण्यासाठी आता केवळ काही तास उरले आहेत. शिव ठाकरे (Shiv Thackeray), वीणा जगताप (Veena Jagtap), नेहा शितोळे (Neha Shitole), शिवानी सुर्वे (Shivani Surve) किशोरी शहाणे-वीज (Kishori Shahane Veej) आणि आरोह वेलणकर (Aroh Velankar) यापैकी कोण विजेतेपदावर आपलं नाव कोरणार, हे रविवारी समजणार आहे. मात्र सोशल मीडियावर बिग बॉसच्या विजेतेपदाबाबत आधीच चर्चा रंगल्या आहेत.

बिग बॉसचा विजेता निवडण्यासाठी वोटिंग लाईन्स आता बंद झाल्या आहेत. मात्र विविध मनोरंजन वाहिन्या आणि वेबसाईट्सनी सोशल मीडियावर आपापले पोल्स घेतले आहेत. बहुतांश पोल्समध्ये प्रेक्षकांनी बहुमताने शिव ठाकरेला आपली पसंती दिली आहे. आठवड्याभरात सहा जणांपैकी शिव ठाकरे वगळता इतर सर्व स्पर्धकांचा पसंतीक्रम बदलत गेला. मात्र शिवने निर्विवादपणे आपलं पहिलं स्थान अढळ ठेवलं आहे.

बहुतांश पोल्सनुसार पसंती क्रम काय?

1. शिव ठाकरे

2. नेहा शितोळे

3. वीणा जगताप

4. शिवानी सुर्वे

5. किशोरी शहाणे वीज

6. आरोह वेलणकर

शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची ट्रॉफी उंचावणार, असं जवळपास निश्चित मानलं जात आहे. शिवइतकीच नेहासुद्धा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाते. शिव आणि वीणा हे टॉप 2 ठरण्याची शक्यता कमी आहे. खेळातील चुरस कायम ठेवण्यासाठी त्या दोघांना टॉप 2 मध्ये ठेवण्याऐवजी नेहाला दुसऱ्या आणि वीणाला तिसऱ्या क्रमांकावर स्थान दिलं जाऊ शकतं.

खरं तर, दुसऱ्या स्थानासाठी वीणा, नेहा आणि शिवानी या दोघींमध्ये चढाओढ होती. पहिल्या चार क्रमांकावर असलेल्या स्पर्धकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरु होती. चौघांना मिळालेल्या मतांमध्ये फारसं अंतर नाही.

बिग बॉसच्या घरात कायम एकमेकींसमोर उभ्या ठाकणाऱ्या टीव्ही प्रेक्षकांच्या लाडक्या नायिकांपैकी ‘राधा’ आणि ‘देवयानी’ यापैकी कोण अग्रेसर ठरणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. शिवानीचा गेम सुधारलेला असला, तरी कायद्याची भाषा करत बिग बॉसमधून झालेली तिची वादग्रस्त एक्झिट आणि पुनरागमन यामुळे तिच्या प्रवासाला कलंक लागला.

‘किशोरीताई’ पिछाडीवर

किशोरी शहाणे वीज या खरं 90 च्या दशकातील लाडक्या अभिनेत्री. बिग बॉसच्या घरात त्यांचा आवाज कधीच चढला नाही. त्यांनी कधी कोणाशी वाद घातला नाही, किंवा कोणावर टीकाही केली नाही. उलट त्यांच्यासोबतच फटकून वागलं गेलं. धीर सुटल्यामुळे अनेक वेळा त्यांचे अश्रूही अनावर झाले. नऊ आठवड्यात आठ वेळा त्या नॉमिनेट झाल्या. या आठवड्यात किशोरीताई बाद होणार, असा प्रेक्षकांचा कयास त्यांनी कायम चुकीचा ठरवला. परंतु शिव, वीणा, शिवानी यांच्या चाहत्यांपुढे किशोरी यांची प्रसिद्धी निष्प्रभ ठरत आहे. त्यांना एकदाच चौथ्या स्थानापर्यंत मजल मारता आली होती. मात्र ट्रेण्डनुसार त्या पाचव्याच क्रमांकावर आहेत.

‘रेगे’ सर्वात मागे

वाईल्ड कार्ड एन्ट्री असलेला ‘रेगे’फेम अभिनेता आरोह वेलणकर हा सोशल मीडियावरील ट्रेण्डमध्ये कायमच सहाव्या स्थानावर राहिला आहे. खेळात उशिरा सहभागी झाल्याचा फटका त्याला बसला आहे. आरोहचा गेम चांगला राहिला असला, तरी कायमच तो भावनिक होत रडताना दिसतो.

शिव ठाकरेचा रंजक प्रवास

शिव ठाकरे हा मूळ अमरावतीचा पठ्ठ्या. सुरुवातीपासूनच शिव ठाकरे याला प्रेक्षकांनी फेवरिट मानला आहे. ‘रोडीज्’ या रिअॅलिटी शोमधून आलेल्या शिवची सुरुवात काहीशी दबकत झाली. मात्र नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहिला. शिवच्या उच्चारात विदर्भीय हेल असल्यामुळे तो काही वेळा चेष्टेचा धनी ठरला.

बिग बॉसचा पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी करत तो नॉमिनेशन पासूनही वाचत आला होता. या प्रवासात शिव दोन वेळा कॅप्टन झाला होता.

वीणासोबत जोडी जुळली

सुरुवातीला वीणा जगताप आणि शिव वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते, मात्र तिसऱ्या आठवड्यात दोघांमध्ये मैत्री जुळली. मध्यंतरीच्या काळात वीणासोबत त्याची जवळीक वाढल्यामुळे खेळावर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक आणि सहस्पर्धक यांच्यासोबतच सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनीही दिली होती.

दिवसाच्या कोणत्याही प्रहरी त्यांचं फक्त एकमेकांसोबत असणं, सततच्या मिठ्या यामुळे मांजरेकरांनी संताप व्यक्त केला होता. अगदी फॅमिली वीकमध्ये आलेल्या शिवच्या बहीण आणि आईनेही त्याचे कान उपटले होते. त्यानंतर पुन्हा महेश मांजरेकरांनी कानउघाडणी केल्यावर शिव ताळ्यावर आला.

घरातील सर्वांशी मैत्री

बिग बॉसच्या घरात शिवचे फारसे कोणासोबत वाद झाले नाहीत. अभिजीत, वैशाली यांच्यासोबत त्याचं खास नातं होतं. माधव देवचक्केसोबतही त्याचे मैत्र जुळले होते. अभिजीत बिचुकले यांच्याशी त्याची गट्टी होती, तर सुरेखा पुणेकर यांनीही त्याला मुलगा मानलं होतं. रुपाली भोसलेला शिव ताई म्हणायचा, तर हीना पांचाळसोबतही त्याची खास मैत्री होती. पहिल्याच आठवड्यात बाद झालेल्या मैथिली जावकरने त्याला तिकीट टू फिनालेसाठी वोट केलं होतं.

आरोहच्या हाताचा चावा

पराग कान्हेरे, नेहा-शिवानी यांच्यासोबत झालेल्या वादांचा अपवाद वगळता शिवने फारशी कॉन्ट्रोव्हर्सी केली नव्हती. कॅप्टन्सी टास्कमध्ये तो आवेगात आरोहच्या हाताला चावला, तेव्हा मात्र सर्वांनीच शिवला रागे भरलं होतं. परंतु एकूणच शिवची प्रगती पाहता तो गेममध्ये लोकप्रिय ठरणं निःसंशय आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली होती. अंतिम दोन स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातील दिवे बंद करुन बाहेर पडण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे गेल्या पर्वात मेघा आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी ही रित निभावली होती. यंदा कोण टॉप 2 स्पर्धक ठरणार, याचं उत्तर रविवारी मिळेल.