माफी मागा अन्यथा 23 कोटींचा दावा दाखल करु, प्रशांत बंब यांची चिखलीकरांना नोटीस

| Updated on: Feb 02, 2020 | 8:09 PM

भाजप आमदार प्रशांत बंब आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रशांत बंब यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना नोटीस बजावली आहे.

माफी मागा अन्यथा 23 कोटींचा दावा दाखल करु, प्रशांत बंब यांची चिखलीकरांना नोटीस
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रशांत बंब यांना ‘ब्लॅकमेलर’ असं संबोधलं होतं. यावरुनच प्रशांत बंब यांनी चिखलीकरांना वकिलामार्फत नोटीस बजावली आहे (Prashant bamb legal Notices to Pratap Chikhalikar). “जाहीर माफी मागा अन्यथा 23 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु”, असा इशारा बंब यांनी नोटीसमधून दिला आहे. त्यामुळे प्रशांत बंब आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात कायदेशीर लढा सुरु होण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आमदार प्रशांत बंब आणि खासदार प्रतापराव चिखलीकर हे दोघेही एकाच पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. आमदार प्रशांत बंब यांनी प्रतापराव पाटील यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामातील घोटाळ्याबाबत मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. मात्र यावर प्रतापराव पाटील यांनी थेट राज्याच्या सचिवांनाच पत्र लिहून प्रशांत बंब हे ब्लॅकमेलर आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊ नये, असं सांगितलं होतं. आमदार प्रशांत बंब यांच्या हाती थेट हेच पत्र लागलं आणि त्यानंतर प्रशांत बंब यांनी “आपण ब्लॅकमेलर कसे? याचं उत्तर खासदारांनी द्यावं”, असं आव्हान दिलं. मात्र त्या आव्हानाला खासदार चिखलीकर अपेक्षित उत्तर देऊ शकले नाहीत (Prashant bamb legal Notices to Pratap Chikhalikar).

नोटीस मिळालेली नाही : खासदार चिखलीकर

प्रशांत बंब यांनी चिखलीकरांना येत्या 17 तारखेपर्यंत माफी मागण्याची वेळ दिली आहे. जर चिखलीकर यांनी माफी मागितली नाही तर आमदार बंब हे चिखलीकर यांच्यावर तब्बल 23 कोटी रुपयांचा दावा दाखल करणार आहेत. त्यामुळे येत्या 17 तारखेपर्यंत प्रतापराव पाटील चिखलीकर प्रशांत बंब यांची माफी मागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत चिखलीकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, “त्यांनी नोटीस अद्याप मला मिळालेली नाही, नोटीस मिळाल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देता येईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘tv9 मराठी’ला दिली आहे.