मुंबई महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या ‘या’ तीन शाळांमध्ये प्रवेश नोंदणी सुरु, वाचा सविस्तर

| Updated on: Mar 11, 2021 | 6:50 PM

मुंबई महापालिकेच्यावतीनं सीबीएसई बोर्ड सुरु होणाऱ्या 10 पैकी तीन शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. BMC CBSE Board school admission Process

मुंबई महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या या तीन शाळांमध्ये प्रवेश नोंदणी सुरु, वाचा सविस्तर
महापालिकेच्या सीबीएसई शाळांसाठी प्रवेश नोंदणी
Follow us on

मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्यावतीनं 10 शाळांमध्ये सीबीएसएई बोर्डाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या शाळांना मुंबई पब्लिक स्कूल असं नाव देण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देता यावे. हा उद्देश त्यासाठी ठेवण्यात आला होता. सीबीएसई बोर्ड सुरु होणाऱ्या 10 पैकी तीन शाळांमध्ये मुंबई महापालिकेने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. (BMC CBSE Board schools in Mumbai three school admission process started check details)

तीन शाळांमध्ये प्रवेश नोंदणी सुरु

हरियाली व्हिलेज महानगरपालिका शाळा, विक्रोळी , राजावाडी महानगरपालिका शाळा, विद्याविहार आणि अझीझ बाग महानगरपालिका शाळा, चेंबूर या तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी नोंदणी सुरु झाली आहे. पालिकेच्या या नव्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये ज्युनियर केजी (शिशुवर्ग), सिनीयर केजी (बालवर्ग) आणि पहिली ते सहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंतचे वर्ग वाढवले जाणार आहेत.

प्रवेश अर्ज कुठे भरायचा

हरियाली व्हिलेज महानगरपालिका शाळा, विक्रोळी , राजावाडी महानगरपालिका शाळा, विद्याविहार आणि अझीझ बाग महानगरपालिका शाळा, चेंबूर या तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी नोंदणी सुरु झाली आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlMumPublic12 या वेबसाईटवर प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. प्रवेश अर्ज नोंदवण्यसाठी 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

90 टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने होणार

पालिकेच्या सीबीएसई शाळांमधील 90 टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने होणार आहेत, तर 5 टक्के प्रवेश महापौरांच्या शिफारसीनुसार दिले जाणार आहेत. तसेच 5 टक्के प्रवेश महापालिका कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. या प्रवेशात आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या शाळा
(पालिकेचा विभाग : शाळा)

जी-उत्तर : भवानी शंकर रोड शाळा
एफ-उत्तर : कानेनगर, मनपा शाळा
के-पश्चिम : प्रतीक्षा नगर मनपा शाळा
एल : तुंगा व्हिलेज, नवीन इमारत
एन : राजावाडी मनपा शाळा
एम-पूर्व 2 : अझीज बाग मनपा शाळा
पी-उत्तर : दिंडोशी मनपा शाळा
पी-उत्तर : जनकल्याण नवीन इमारत
टी : मिठानगर शाळा, मुलुंड
एस : हरियाली व्हिलेज, मनपा शाळा, विक्रोळी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने जोगेश्वरीतील पूनमनगर शाळेत यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या सीबीएसई शाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्या अनुभवाच्या आधारे पालिकेने इतर ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, पालिकेच्या 10 शाळांमध्ये शिशुवर्ग ते सहावीपर्यंत एकेक तुकडी सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

पालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना

मोठी बातमी : मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांचं नाव बदलणार

(BMC CBSE Board schools in Mumbai three school admission process started check details)