कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार- भाजप

| Updated on: Oct 20, 2020 | 7:55 AM

सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची क्षमता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच आहे. | JP Nadda

कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार- भाजप
Follow us on

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची साथ आटोक्यात येऊन परिस्थिती थोडीशी सुधारल्यानंतर केंद्र सरकारकडून लगेचच नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी केली जाईल, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. केवळ कोरोनाच्या साथीमुळे CAA ची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. मात्र, आता सर्वच ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे आता सरकारकडून CAA च्या नियमांची आखणी केली जाईल. यानंतर लवकरच CAA कायद्याची अंमलबजावणी होईल आणि तुम्हा सर्वांना त्याचा लाभ मिळेल. आम्ही CAAच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहोत, असे जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट केले. (CAA delayed by Covid implementation says JP Nadda)

ते सोमवारी पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमात बोलत होते. पुढीलवर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जे.पी. नड्डा यांनी काल उत्तर बंगालमधील संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सिलिगुडी येथील बैठकीत भाजपच्या खासदार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी काही स्थानिक सामाजिक आणि धार्मिक समूहांची भेटही घेतली.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ‘फोडा आणि राज्य करा’, या धोरणाचा अवलंब करत आहेत. तसेच ममता यांच्या हट्टामुळे पश्चिम बंगालमधील नागरिक मोदी सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांपासूनही वंचित राहिल्याची आरोप नड्डा यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाने चालतात. त्यामुळे प्रत्येकाला विकासाची संधी मिळते. याउलट ममता बॅनर्जी या दुहीचे राजकारण करतात. आता विधानसभा निवडणूक आल्यावर ममता बॅनर्जी काहीतरी आमिष दाखवून सगळ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतील. परंतु, सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची क्षमता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच आहे. भाजपकडून पश्चिम बंगालच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असेही नड्डा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Corona : सीएए आणि एनआरसीच्या भीतीने बुलडाण्यात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी हाकलून लावले

‘सीएए आणि एनपीआरला घाबरु नये’, पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

‘सीएए’विरोधी आंदोलन झालेल्या शाहीन बागमध्ये कोण आघाडीवर?

सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल : उर्मिला मातोंडकर

(CAA delayed by Covid implementation says JP Nadda)