छापा टाकायला गेलेल्या 2 पोलीस कर्मचार्‍यांवरच जबरी चोरीचा गुन्हा

वर्धा : अल्लीपूर येथे 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मांसळी विक्रेत्याचे पैसे हिसकावल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी संबंधित पोलिसांना बेदम मारहाण केली. तसेच जबरी चोरीचा गुन्हाही दाखल केला. दिवसभराच्या व्यवसायाचा हिशेब सुरु असताना पोलिसांनी जुगार समजून मांसळी विक्रेत्यांचे पैसे हिसकल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे हिसकावण्याचा हाच प्रकार पोलिसांच्या अंगलट आला आणि नागरिकांनी दोन्ही पोलिसांना […]

छापा टाकायला गेलेल्या 2 पोलीस कर्मचार्‍यांवरच जबरी चोरीचा गुन्हा
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

वर्धा : अल्लीपूर येथे 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मांसळी विक्रेत्याचे पैसे हिसकावल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी संबंधित पोलिसांना बेदम मारहाण केली. तसेच जबरी चोरीचा गुन्हाही दाखल केला.

दिवसभराच्या व्यवसायाचा हिशेब सुरु असताना पोलिसांनी जुगार समजून मांसळी विक्रेत्यांचे पैसे हिसकल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे हिसकावण्याचा हाच प्रकार पोलिसांच्या अंगलट आला आणि नागरिकांनी दोन्ही पोलिसांना चोर समजून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांच्या तक्रारीवरुन 15 ते 20 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे स्थानिकांच्या तक्रारीवरुन या 2 पोलीस कर्मचार्‍यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सचिन सुरकार आणि राजरत्न खडसे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. हे दोघे हिंगणघाट तालुक्याच्या अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या ठाण्यांतर्गत कात्री येथे जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन दोघेही छापा टाकायला गेल्याचे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले जाते आहे. दुसरीकडे गावकऱ्यांनी सांगितले, “कात्री येथे मासे विक्रेते आठवडी बाजारातून मांसळी विक्रीच्या पैशांचा हिशेब करत चालले होते. त्यावेळी वर्दीत (गणवेश) नसलेल्या पोलिसांनी या विक्रेत्यांकडून पैसे हिसकावले. त्यावेळी उपस्थितांनी दोघांनाही चोर समजून मारहाण केली.”

जमावाच्या तावडीतून सुटल्यानंतर पोलिसांनी ठाणे गाठून तक्रार केली. त्यात 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 5 ते 6 जणांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी या दोन्ही पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत दोन्ही पोलीस कर्मचारी तेथे उपस्थितांना मारहाण करत पैसे घेऊन पळत असल्याचे सांगितले जात आहे. या तक्रारीवरुन दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीही स्थानिकांवर गुन्हा दाखल केला. मात्र, दोन्ही पोलीस कर्मचारी पसार झाले आहेत. पोलीस कर्मचारी आणि स्थानिकांमधील घटनेप्रसंगीचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत.