मार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय?, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका

| Updated on: Sep 28, 2020 | 11:10 PM

मार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय?, अशी टीका कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची यांनी केली आहे. (Chandrakant patil Criticized Congress Over Agriculture Bill)

मार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय?, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका
Follow us on

मुंबई :  संसदेने पारित केलेल्या कृषी विधेयकाला काँग्रेस जोरदार विरोध करत आहे. “काँग्रेसला शेतकऱ्यांचे नुकसान करायचं आहे. मार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडली आहे काय?”, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. कृषी विधेयकासंदर्भात काँग्रेस अपप्रचार करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant patil Criticized Congress Over Agriculture Bill)

“केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विचार करून कृषी कायदे आणले आहेत. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूंच्या कायद्यांना विरोध करत आहे कारण त्यांना शेतकऱ्यांचं भलं करायचं नाही तर नुकसान करायचंय. मला प्रश्न पडलाय की मार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडली आहे काय?”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राऊत-देवेंद्र फडणवीस भेटीवर देखील चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं. संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये काही राजकीय विषय आले का? तर हो. त्यांच्या भेटीमध्ये काही राजकीय मुद्दे आले. पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, असं म्हणत या भेटीमुळे राजकीय बदल होतील असं मला वाटत नाही, असंही सांगायला पाटील विसरले नाहीत.

शिवसेनेच्या भूमिकेविषयी बोलताना त्यांनी सेनेवर सडकून टीका केली. “खरं तर सेनेला त्यांची भूमिकाच नसते. काँग्रेस राष्ट्रवादीला खूश करणं हीच त्यांची वर्षभरापासूनची भूमिका राहिलेली आहे. लोकसभेत ते पाठिंबा देतात आणि राज्यसभेत ते विरोध करतात कारण त्यांना काँग्रेसची भिती वाटते”, असं पाटील म्हणाले .

“मध्यावधी निवडणुका कोणत्याच पक्षाला नको असतात. निवडणूक कार्यक्रमाची आखणी, उमेदवार देणे, प्रचारसभा लावणे हे लगोलग शक्य होणाऱ्या गोष्टी नसतात. पण अस्थिततेमधून सोल्युशन काय हे पण लक्षात येत नाही. निवडणुका न होण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतील, पण कोणाचेच कॉम्बिनेशन जमलं नाही तर मग पर्याय रहाणार नाही”, असं मत मध्यावधी निवडणुकसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

काल जाहीर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर देखील चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलं. “पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालं. मी अगोदरच सांगितलं होतं त्यांना महाराष्ट्रातल्या कार्यकारिणीत जरी स्थान मिळालं नसलं तरी त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळेल आणि काल त्यांना तशी जबाबदारी मिळाली आहे”, असं पाटील म्हणाले.

(Chandrakant patil Criticized Congress Over Agriculture Bill)

संबंधित बातम्या

केंद्राने कृषी कायदे पास करुन लोकशाहीचा गळा घोटला, काँग्रेसचा हल्लाबोल, राज्यपालांना निवेदन

महाराष्ट्रात कृषी विधेयक कायदा लागू होणार नाही, काँग्रेस नेते राजीव सातव यांचा इशारा