गाईला वाचवा आणि बाईला नाचवा, डायलॉगबाजीत भुजबळांचं सरकारवर टीकास्त्र

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडणं सुरुच ठेवलं आहे. राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान भुजबळांनी सरकारवर डान्सबार बंदीवरुन टीका केली. “आपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या. शासनाची धोरणे आहेत गाईला वाचवा आणि बाईला नाचावा, अशा डायलॉगबाजीत भुजबळांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. भुजबळ म्हणाले, […]

गाईला वाचवा आणि बाईला नाचवा, डायलॉगबाजीत भुजबळांचं सरकारवर टीकास्त्र
Follow us on

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडणं सुरुच ठेवलं आहे. राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान भुजबळांनी सरकारवर डान्सबार बंदीवरुन टीका केली. “आपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या. शासनाची धोरणे आहेत गाईला वाचवा आणि बाईला नाचावा, अशा डायलॉगबाजीत भुजबळांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

भुजबळ म्हणाले, “सरकार किती हुशार, त्यांचे वकील किती हुशार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामावर बंदी आणि डान्सबारवरील बंदी उठली, महाराज बंद-डान्सबार चालू, गाईला वाचवा आणि बाईला नाचवा, पुन्हा छमछम बार हे आमचं बीजेपी सरकार”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काल जळगाव इथे परिवर्तन सभा घेण्यात आली. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, फौजिया खान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होते.

जयंत पाटलांचा महाजनांवर हल्लाबोल
या परिवर्तन सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. “या जिल्ह्यात एक मंत्री आहेत, जे आता सुपारी मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात धुळे, जळगाव, अमदनगर, नाशिक या पालिका त्यांनी पैशांच्या जोरावर जिंकल्या”, असं जयंत पाटील म्हणाले.

अजित पवारांचाही महाजनांवर निशाणा
यावेळी अजित पवार यांनीही गिरीश महाजनांवर निशाणा साधला. “मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मला पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू’, असे विधान एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्याबाबत अजित पवार म्हणाले, “बारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. पवार साहेबांना आणि मला बारामतीतून निवडून दिले जात आहे. असे असताना महाजन सांगतात की बारामती जिंकून दाखवू. ते एवढं सोपं आहे का? तरीही इच्छा असेल तर जरूर बारामतीत या”, असे खुले आव्हानही अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना दिले.

बारामती काय आहे ते माहिती आहे का… बारामतीत या तुम्हाला दाखवतोच, अशा शब्दात अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादीच्या सभेत खुर्च्या रिकाम्या
दरम्यान, राष्ट्रवादीच्या या सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं. जळगावकारांनी या परिवर्तन सभेला पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून आले. सभा सुरू असणाऱ्या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या होत्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेत अजित पवार बोलत असताना, मंचावर उपस्थित असलेले नेते जयंत पाटील,फौजिया खान, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ हे सर्वजण मोबाईलमध्ये गुंतले होते.