नाशिकमधील जुन्या वाड्यांचा राडा, लोकांचे जीव टांगणीला

जुन्या वाड्यांची डागडुजी करण्यासाठी अथवा या जागेत नविन बांधकाम करण्यासाठी महापालिका प्रशासन परवानगीच देत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे जुना नाशिक परिसरातील रहिवासी सध्या कात्रीत सापडले आहेत.

नाशिकमधील जुन्या वाड्यांचा राडा, लोकांचे जीव टांगणीला


मुंबई:  नाशिकची ओळख तिर्थक्षेत्र म्हणून असली तरी या शहराची खरी ओळख येथील जुन्या नाशिक परिसराचीच आहे. सध्या जुना नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात धोकादायक वाड्यांची पडझड होत आहे. महापालिका प्रशासन इथल्या रहिवाशांना स्थलांतरीत होण्यासाठी नोटीस बजावत आहे. मात्र, प्रत्यक्षात जुन्या वाड्यांची डागडुजी करण्यासाठी अथवा या जागेत नविन बांधकाम करण्यासाठी महापालिका प्रशासन परवानगीच देत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे जुना नाशिक परिसरातील रहिवासी सध्या कात्रीत सापडले आहेत.

नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचं केंद्रस्थान इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

भेगाळलेल्या भिंती, अर्धवट पडलेल्या खिडक्या आणि छिन्न विच्छिन्न छत, असंच सध्या जुना नाशिक परिसराचं स्वरुप आहे. या परिसरात कधीही कोसळतील अशा अवस्थेतील अनेक घरं आहेत. मागील अनेक वर्षे नाशिकची ओळख जपणाऱ्या या जुन्या वाड्यांची आता एकामागून एक पडझड सुरु आहे. त्यामुळे कधीकाळी नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचं केंद्रस्थान असलेलं जुन नाशिक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

10 दिवसांच्या पावसात जवळपास 6 वाडे जमिनदोस्त

सोमवार पेठ, डिंगरआळी, संभाजी चौक, बुधवार टेक, मधली होळी, खैरे गल्ली, गुलालवाडी, आसराची वेस, चित्रघंटा, नाव दरवाजा, बडी दर्गा, मंगळादेवी चौक ,हुंडीवाला लेन या आणि यासारख्या कितीतरी गल्ल्यांनी नाशिकची इतर भागाशी नाळ जोडून ठेवली आहे. मात्र, काळाच्या ओघात या परिसरातील जुने वाडे जमिनदोस्त होऊ लागले आणि रहिवासीही एकएक करुन स्थलांतरीत होऊ लागलेत. आतापर्यंत नाशिकमध्ये झालेल्या 10 दिवसांच्या पावसात जवळपास 6 वाडे जमिनदोस्त झाले आहेत. 28 जुन रोजी संभाजी चौक परिसरात, 1 जुलै रोजी पिंजार घाट परिसरात, 4 जुलै रोजी चित्रघंटा परिसरातील गोदनेकर वाडा, 6 जुलै रोजी सुकेनकर गल्लीमधील जुना वाडा, 7 जुलै रोजी भोइ गल्ली परिसरातील वाडा आणि 8 जुलै रोजी हेमकुंज परिसरातील जुनी इमारत कोसळल्याच्या घटना घडल्या.

नव्या बांधकामासाठी परवानगी नाकारण्याचा पालिकेचा आडमुठेपणा

या स्थितीत महापालिका प्रशासनाने या वाड्यांना केवळ नोटीस चिटकवण्याचे काम केले आहे. नागरिकांनी जुने वाडे पाडून त्या ठिकाणी नव्या बांधकामासाठी परवानगी मागितली, मात्र, पालिका प्रशासनाकडून नकार देण्यात येत आहे. उलट जुन्या इमारती खाली केल्या नाही, तर पोलीस बळाचा वापर करुन वाडे खाली करु, अशी फुशारकीही महापालिका मारते आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात आहे ते ठिकाण सोडून राहायचे कुठे या प्रश्नाचे उत्तर देणे ते सोईस्करपणे टाळत आहे.

साधी डागडुजी करण्याचीही परवानगी नाही

एकीकडे महापालिका जुने वाडे रिकामे करुन रहिवाशांनी स्थलांतरीत होण्याचे आदेश देत आहे, तर दुसरीकडे वाडा मालकांना साधी डागडुजी करण्याचीही परवानगी नाकारली जात आहे. अनेक नागरिकांनी स्वतःहून धोकादायक वाडा जमिनदोस्त करत नविन बांधकाम करण्यासाठी परवानगी मागितली. मात्र त्यांनाही परवानगी नाकारण्यात आली. परिणामी अनेक नागरिकांचे हाल होत आहेत.

‘महापालिका प्रशासनाची नोटीसच चुकीची’

महापालिका प्रशासनानं याठिकाणच्या जागा मालकांना 4 टक्के एफएसआय द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांना दिडच टक्का एफएसआय मिळत आहे. त्यामुळेही नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. महापालिका प्रशासन देत असलेली नोटीसच चुकीची असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. महापालिका प्रशासनानं शहरात ब्लु लाइन आणि रेड लाइनचं मार्किंग केलं असलं, तरी प्रत्यक्षात हे फक्त तात्पुरतं मार्किंग असल्यानं महापालिका प्रशासनच गोंधळलेलं आहे, असा आरोप होत आहे.

आतापर्यंत जवळपास 350 जुन्या वाड्यांना नोटीस

महापालिका प्रशासनानं आतापर्यंत जवळपास 350 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे. यातील अनेक वाडे यंदाच्या पावसाळयात जमिनदोस्त झाले आहेत. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जुने नाशिक परिसरातील रहिवाशांना अशा धोकादायक परिस्थितीत का रहावं लागतं आहे याचा विचार महापालिका प्रशासन करणार की नाही? असा संतप्त सवालही यानिमित्तानं उपस्थित होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI