गाव कोरोनामुक्त केल्याचा दावा खोटा? मुख्यमंत्र्यांकडून कौतुक झाल्यानंतर घाटणे ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी समिती!

| Updated on: Jun 15, 2021 | 4:11 PM

गावात कोरोनाचे रुग्ण असताना गाव कोरोनामुक्त झाल्याची खोटी माहिती देऊन प्रशासनाची आणि ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केलाय.

गाव कोरोनामुक्त केल्याचा दावा खोटा? मुख्यमंत्र्यांकडून कौतुक झाल्यानंतर घाटणे ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी समिती!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, घाटणे गावचे सरपंच ऋतुराज देशमुख
Follow us on

सोलापूर : कोरोनामुक्त गाव म्हणून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील घाटणे गावातील कोरोनाचं वास्तव काही वेगळंच असल्याचं आता बोललं जात आहे. गावात कोरोनाचे रुग्ण असताना गाव कोरोनामुक्त झाल्याची खोटी माहिती देऊन प्रशासनाची आणि ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केलाय. इतकंच नाही तर सरपंच ऋतुराज देशमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी काही ग्रामस्थांनी बेमुदत धरणं आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेत घाटणे ग्रामपंचायतीची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. (Villagers allege that Sarpanch Rituraj Deshmukh’s claim of Corona-free village is false)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधताना आता प्रत्येक गावाने कोरोनामुक्तीसाठी मोहिम सुरू करण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील घाटणे (ता. मोहोळ) गावचे तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांचाही उल्लेख केला हे तरुण आपलं गाव कोरोनामुक्त करु शकतात तर आपण का नाही? असा प्रश्न करत त्यांनी राज्यातील सर्व गावांना कोरोनामुक्तीची मोहिम हाती घेण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान गावात कोरोनाचे रुग्ण असताना गाव कोरोनामुक्त केल्याचा खोटा दावा करत प्रशासनाची आणि ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी सरपंचांवर केलाय.

ऋतुराज देशमुखांनी फसवणूक केल्याचा आरोप

नागरिकांना सुविधा पुरवत गावात फवारणी केली. चाचण्या केल्या अशी माहिती सरपंच ऋतुराज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली. प्रत्यक्षात गावात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही सुविधा देण्यात आली नाही. सरपंचांनी स्वत:च्या वार्डात मोजक्याच लोकांना मास्कचं वाटप केलं. कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असताना गाव कोरोनामुक्त झालं, अशी खोटी माहिती प्रसिद्धीला देत प्रशासन आणि ग्रामस्थांची फसवणूक केली गेली, असा आरोप काही गावकऱ्यांनी केलाय.

घाटणे ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी समिती

या प्रकरणात सरपंच ऋतुराज देशमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरु केलं. मोहोळ पंचायत समिती कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत ग्रामपंचायतीची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल 4 दिवसांत येणार असल्याची माहिती मिळतेय. या अहवालानंतर घाटणे गाव खरंच कोरोनामुक्त झालं की काही गावकऱ्यांनी केलेला आरोप खरा आहे, हे स्पष्ट होईल.

गावात या उपाययोजना केल्याचा सरपंचांचा दावा

  • गावातील जी मंडळी शहरात जातात किंवा लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसायात असतात, त्यांच्या आवश्‍यकतेनुसार रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या
  • गावातील 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले
  • गावात घरोघरी जाऊन आशा ताईंच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी केली जात असून त्यात त्याची ऑक्‍सिजन लेव्हल, तापमान चेक केले जाते
  • प्रत्येक कुटुंबाला एक “कोरोना सेफ्टी किट” दिले असून त्यात व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण उपलब्ध
  • बाहेर गावातून राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने तीन दिवस क्वारंटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चेन ब्रेक करण्याचा केला प्रयत्न
  • सगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष किंवा मिनी कोव्हिड सेंटर जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून सुरू करण्याचा यापुढे विचार
  • करोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर गाव कोरोनामुक्त केले.
  • गावात कोरोनाने दोन मृत्यू झाल्यानंतर लोकं वाड्या-वस्त्यांवर राहण्यासाठी जाऊ लागली. इतके भीतीचे वातावरण कोरोनामुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले होते. मात्र, ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केल्यानंतर पुन्हा एकदा वाड्या-वस्त्यांवर राहण्यासाठी गेलेले ग्रामस्थ गावात राहण्यासाठी येत आहेत.

संबंधित बातम्या :

कोविडमुक्त गाव! सरपंच पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, ऋतुराजची अवघ्या 21 वर्षात ग्रामपंचायतीत एन्ट्री

Villagers allege that Sarpanch Rituraj Deshmukh’s claim of corona-free village is false