‘घरापासून दूर, आर्थिक कुचंबणा, कोरोनाची भीती’, मानसिक व्याधींना तोंड देणाऱ्या 47 हजार मजुरांचं समुपदेशन

| Updated on: Apr 25, 2020 | 12:27 AM

घरापासून दूर राहणे, आर्थिक कुचंबणा, कोरोना आजाराची सुप्त भीती यामुळे या मजुरांना अनेक मानसिक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे (Counseling of Migrant labor).

घरापासून दूर, आर्थिक कुचंबणा, कोरोनाची भीती, मानसिक व्याधींना तोंड देणाऱ्या 47 हजार मजुरांचं समुपदेशन
Follow us on

मुंबई : कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर राज्यातील आणि राज्याबाहेरील असंघटीत क्षेत्रातील मजूर अडकले आहेत. सुमारे 944 निवारागृहांमध्ये हे मजूर राहत आहेत. या स्थलांतरित मजुरांची राहण्याची आणि जेवणाची सोय विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. मात्र, घरापासून दूर राहणे, आर्थिक कुचंबणा, कोरोना आजाराची सुप्त भीती यामुळे या मजुरांना अनेक मानसिक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे (Counseling of Migrant labor). यावर उपाय म्हणून जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे या स्थलांतरित मजूरांचं समुपदेशन करण्यात येत आहे.

प्रशासनामार्फत या स्थलांतरीत मजुरांना विविध सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. याच जोडीला त्यांना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे मानसिक समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत सुरु आहे. आतापर्यंत राज्यातील 47 हजार स्थलांतरित मजुरांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांचेही समुपदेशन केले जात आहे.

याविषयी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “कोरोनाची सोप्या भाषेत माहिती, घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करु नये याबाबत या मजूरांना माहिती देण्यात येत आहे. समुपदेशक, मनोविकार तज्ञ आणि मनोविकार परिचारिका यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. या समुपदेशनाचा विधायक परिणाम मजूर वर्गामध्ये दिसत आहे.”

समुपदेशना दरम्यान, ज्या मजूरांना मध्यम ते गंभीर स्वरुपाचे मनोविकार आहेत त्यांना भरती करुन योग्य ते उपचार देण्यात येत आहेत. सध्या सुमारे 8 हजारांच्या आसपास लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिथे जाऊन त्यांचे समुपदेशन करुन त्यांच्या अडचणी समजवून घेण्याचे काम केले जात आहे.

राज्यात सध्या 30 समुपदेशक, 28 मनोविकार तज्ज्ञ, 36 मनोविकार नर्स यांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात साधारणत: 2 ते 3 पथकं नेमण्यात आली आहेत. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून यापथकांकडून प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात समुपदेशनाचे काम केले जाते. गेल्या वर्षी या पथकामार्फत कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरानंतर तेथील पूरग्रस्तांनाही समुपदेशनाचं काम करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

Corona : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 6817 वर, कोठे किती रुग्ण?

दहिसर येथे माहेरी 1 महिना मुक्काम, भिवंडीत परतलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग

Nitin Gadkari Exclusive | देशातील लॉकडाऊन वाढणार का? नितीन गडकरी म्हणतात…

Counseling of Migrant labor in Maharashtra