गावकरी पलिकडे, फडणवीस अलिकडे, पूल वाहून गेल्याने शेतकरी पोहत-पोहत फडणवीसांच्या भेटीला

| Updated on: Oct 19, 2020 | 1:42 PM

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेतेमंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत.

गावकरी पलिकडे, फडणवीस अलिकडे, पूल वाहून गेल्याने शेतकरी पोहत-पोहत फडणवीसांच्या भेटीला
Follow us on

पुणे : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेतेमंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दौंड-बारामती भागात आहेत. पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने भगदाडं पडली आहेत. (Daund Farmer came swimming to meet Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील शेवटच्या गावात स्वामी चिंचोली या गावात जाऊन पाहणी केली. या गावात जाणारा डांबरी रस्ता अतिवृष्टीत वाहून गेला. त्यासाठी त्यांनी चालत जाऊन चिखल-गाळ तुडवत ओढा पार करुन गावकऱ्यांशी संवाद साधला.

त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील मळद गावातील शेख वस्तीतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस ओढ्याच्या अलिकडे, गावकरी पलिकडे अशी अवस्था होती. ज्या ओढ्याच्या काठावर उभे होते, त्या ओढ्याचा पूल प्रचंड पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या आवाजात पलिकडील गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. गेल्या आठ दिवसांपासून या गावात लाईट नाही, अन्न-धान्याचं नुकसान झाल्याने, अनेकांना उपाशी रहावं लागत आहे.

फडणवीस हे ओढ्याच्या पलिकडे असल्याने, आपली व्यथा मांडण्यासाठी गावातील पोपट मुलाणी हे पोहत पोहत त्यांच्यापर्यंत पोहोचले. पाण्यातूनच त्यांनी आपल्या व्यथा माध्यमांसमोर व्यक्त केल्या.

यावेळी टीव्ही 9 मराठीशी बातचीत करताना फडणवीस म्हणाले, “आठ दिवसांपासून या नागरिकांचा संपर्क नाही. विजेचे खांब वाहून गेल्याने वीज नाही. सरकारने कोणत्याही मदतीआधी या लोकांपर्यंत पोहोचणंच महत्त्वाचं आहे. ऊसाची शेती नेस्तनाबूत झाली आहे. अधिकारी आले नाहीत. पंचनामे झाले नाहीत. पंचनाम्याची गरज नाही. लोकांशी संपर्क होणं हे महत्त्वाचं आहे. शेतीचं १०० टक्के नुकसान झालं. शेतकरी संकटात आहे”

शेतकऱ्यांकडे अन्नधान्य आहे. पण वीज गेल्याने दळण होत नाही. सरकारने मदत द्यावी म्हणून सरकारवर दबाव निर्माण करु. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना ते मागण्या करायचे. आता त्यांना ईश्वराने मदतीसाठी शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने मदत करावी. तातडीने मदत करण्यासाठी काहीही लागत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(Daund Farmer came swimming to meet Devendra Fadnavis)