इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष न्यायालयातच पडले, जागेवर मृत्यू

| Updated on: Jun 18, 2019 | 8:45 AM

इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सींचा न्यायालयाच्या कामकाजादरम्यानच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इजिप्तमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मोर्सी यांच्यावर हेरगिरीची आरोप असून त्याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु आहे.

इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष न्यायालयातच पडले, जागेवर मृत्यू
Follow us on

कैरो: इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सींचा न्यायालयाच्या कामकाजादरम्यानच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इजिप्तमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मोर्सी न्यायालयात आले होते. मात्र, दरम्यान ते बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप असून त्याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु आहे.

मोहम्मद मोर्सी यांचे वय 67 वर्षे होते. ते इजिप्तचे पाचवे राष्ट्राध्यक्ष होते. विशेष म्हणजे ते इजिप्तचे लोकशाही पद्धतीने निवडून येणारे पहिलेच राष्ट्राध्यक्ष होते. 2013 मध्ये इजिप्तच्या सेनेने बंड केल्यानंतर त्यांना सत्तेतून बाहेर करण्यात आले आणि अटक करुन त्यांच्यावर हेरगिरीची आरोप ठेवण्यात आले. मोर्सी 30 जून 2012 पासून 3 जुलै 2013 पर्यंत राष्ट्राध्यक्ष पदावर होते. सेनेने त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांच्याजागेवर अब्दुल फताह अल-सीसी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झाले.

मोहम्मद मोर्सी यांना सेनेकडून सत्तेवरुन हटवल्याने मुस्लिम ब्रदरहुडशी संबंधित नेत्यांवरही कारवाई करण्यात आली. मोर्सींच्या अनेक समर्थकांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या झाल्या. अनेक लोक तर एका रात्रीतून गायब झाल्याचेही सांगितले जाते.

दरम्यान, इजिप्तमध्ये 2011 मध्ये क्रांती होऊन हुकमशाहा होस्नी मुबारक यांना सत्तेवरुन हटवण्यात आले. त्यानंतर मे-जून 2012 मध्ये अध्यक्षीय निवडणुका घेण्यात आल्या. त्यात मोर्सी यांनी विजय मिळवला. 30 जून 2012 रोजी मोर्सी इजिप्तचे पहिले लोकशाही मार्गाने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष बनले होते.