बाईकस्वार 5 वर्षीय मुलीचा मांजाने गळा कापल्याने मृत्यू

| Updated on: Aug 26, 2019 | 8:15 AM

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतंग उडवताना वापरणाऱ्या चिनी मांजाने रविवारी (25 ऑगस्ट) 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.

बाईकस्वार 5 वर्षीय मुलीचा मांजाने गळा कापल्याने मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतंग उडवताना वापरणाऱ्या चिनी मांजाने रविवारी (25 ऑगस्ट) 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना दिल्लीच्या खजूरी खास येथील आहे. इशिका असं या मृत मुलीचं नाव आहे.

ही लहान मुलगी आपल्या वडीलांसोबत बाईकवर पुढे बसली होती. त्यावेळी रस्त्यात पतंगीचा मांजा मुलीच्या गळ्याला लागल्याने तिचा गळा कापला गेला. या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे कुटुंब जमुना बाजार येथील हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी कलम 304 नुसार गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत पतंगीच्या मांजामुळे अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतेच एका तरुण इंजिनिअर मानव शर्मा याचाही मांजामुळे मृत्यू झाला होता.

विशेष म्हणजे दिल्ली हायकोर्टाने शहरात चिनी मांजा विकण्यावर बंदी घातली होती. मात्र 15 ऑगस्टपासून पुन्हा उघडपणे मांजा दिल्लीच्या दुकानात विकला जात होता.