मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयात न्या, महाजनांना सांगितल्याप्रमाणे फडणवीस सेंट जॉर्जमध्ये

| Updated on: Oct 24, 2020 | 3:58 PM

दौऱ्यांवेळी आपल्याला कोरोना संसर्ग होण्याची भीती वाटत असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी महाजनांकडे ही गोष्ट बोलून दाखवली होती.

मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयात न्या, महाजनांना सांगितल्याप्रमाणे फडणवीस सेंट जॉर्जमध्ये
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप असल्याने डॉक्टरांनी फडणवीसांवर उपचार सुरु केले आहेत. (Devendra Fadnavis tested COVID Positive admitted to Saint George Hospital)

फडणवीसांनी आपला मित्र आणि भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांना काही महिन्यांपूर्वी “मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा” अशी विनंती केली होती. त्यानुसार सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयातच त्यांना दाखल करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीसांनी कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. मी स्वतःला विलग करुन घेतले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजन यांना जुलै महिन्यात केली होती. फडणवीस-महाजन यांच्या फोनवरील संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर खुद्द महाजनांनीच अशी बातचित झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

फडणवीस त्यावेळीही राज्यात अनेक दौरे करत होते. त्यामुळे आपल्याला कोरोना संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत होती. त्यानंतर आपल्या मित्राजवळ त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती.

महाजन-फडणवीसांमध्ये काय संभाषण?

“नेते मंडळी, मंत्रिमंडळातील सदस्य, धनदांडगे मंडळी आहेत, ते ब्रिच कँडीमध्ये दाखल होतात. त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यामुळे ते अॅडमिट होऊ शकतात, पण सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. साहेबांनाही (देवेंद्र फडणवीस) तेच वाटत होतं, की ठीक आहे कोणी ब्रिच कँडीला दाखल होईल, कोणी लीलावतीला होईल, कोणी जसलोकला होईल, कोणी बॉम्बे हॉस्पिटलला होईल, नेते मंडळी आहेत, आमदार-खासदार, मंत्री आहेत. पण मला जर कोरोना… होऊ नये, होणार नाही, पण कोरोनाची लागण झाली, तर मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, सेंट जॉर्जमध्येच दाखल करायचं, असं मला सांग” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं गिरीश महाजन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’कडे प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं.

आतापर्यंत माझ्या जे जे कोणी संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी संपर्कात आलेल्या लोकांना दिला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, अशी माहिती ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Devendra Fadnavis tested COVID Positive admitted to Saint George Hospital)

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांना फडणवीसांनी भेटी दिल्या होत्या. परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍यांची भेट घेत फडणवीसांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी कुरकुंभ, दौंड, भिगवण, इंदापूर, परंडा, टेंभुर्णी येथील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती.

या भेटीदरम्यान त्यांच्या संपर्कात अनेक नेते, गावकरी आले होते. याशिवाय त्यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारदौरेही केले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग

(Devendra Fadnavis tested COVID Positive admitted to Saint George Hospital)