पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

| Updated on: Jul 07, 2019 | 12:25 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह पाच जणांविरोधात विद्यार्थ्यांनी न्यायलयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायलयाने कुलगुरू आणि इतर व्यक्तींवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
Follow us on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे विद्यापीठाच्या उपाहारगृहात वारंवार अळ्या निघत असल्याने विद्यार्थ्यांकडून आंदोलन छेडलं होतं. त्याप्रकरणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आता या प्रकरणी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह पाच जणांविरोधात न्यायलयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायलयाने कुलगुरू आणि इतर व्यक्तींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकण, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षा रक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत या पाच जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनगृह) काही जणांच्या जेवणात अळ्या सापडल्या होत्या. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेत आंदोलन केले होते. मात्र यावर कारवाई होण्याऐवजी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यामुळे आकाश भोसले या विद्यार्थ्यासह इतर पाच जणांविरोधात न्यायलयात तक्रार दाखल केली.त्यावेळी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश दिले होते.

मात्र त्यानंतर विद्यार्थी आकाश भीमराव भोसले या विद्यार्थ्याने पुणे न्यायलयात धाव घेत, पाच जणांवर तक्रार दाखल केली होती.

दरम्यान या प्रकरणी न्यायलयातील सुनावणीदरम्यान कुलगुरू नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पटेल, सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक सुरेश भोसले आणि अजित सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान काल शनिवारी (6 जुलै) या पाच जणांविरोधात अॅट्रोसिटी कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशीही करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.