
चंद्रपूर : एकोडी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली (zp School slab collapse) आहे. या शाळेची नुकतीचे नव्याने दुरुस्ती केली असूनही भिंत आणि स्लॅब ढासळत आहेत. अशा अवस्थेतही गावातील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत शिकण्यास येत आहेत. प्रशासनाला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले (zp School slab collapse) जात आहे.
विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला तास हा स्लॅबचे पडलेले तुकडे उचलण्यात निघून जातो. परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी अनेकदा निवेदन देत विनंत्या केल्या. मात्र याचा कुठलाही फायदा झालेला नाही. कोसळत्या स्लॅबसह आणि ढासळत्या भिंतींसह विद्यार्थी भीतीच्या सावटात शिक्षण घेत आहेत.
या शाळांमधील विद्यार्थी आणि पालक-शिक्षक देखील या इमारतीच्या ढासळत्या अवस्थेविषयी चिंताग्रस्त आहेत. पावसाळ्यात तर छतामधून झरे वाहतात. मुलांच्या अंगावर, पाठ्यपुस्तकांवर देखील पावसाचे पाणी पडते. मात्र सतत पाठपुरावा करूनही या शाळेची अवस्था काही बदललेली नाही. शिक्षकांनी चिमुकल्यांच्या भविष्याच्या दृष्टीने तरी ही शाळा इमारत नव्याने बांधून द्या अशी मागणी केली आहे.
दरवर्षी चंद्रपूर जिल्हा परिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प जाहीर होतो. त्यात नित्यनेमाने शाळा वर्गखोल्या-संरक्षक भिंती यासाठी निधी दिला जातो. आता हा निधी नेमका कुठे आणि कोणासाठी खर्च होतो हा प्रश्न तेथील स्थानिकांना पडला आहे. एकोडीतील विद्यार्थ्यांना आणखी किती काळ भीतीच्या सावटात शिक्षण घ्यावे लागेल याचे उत्तर कुणाकडेही नाही.