पाकिस्तानमध्ये मिरची 400 रुपये किलो, टोमॅटोही 200 च्या वर

पाकिस्तानमध्ये मिरची 400 रुपये किलो, टोमॅटोही 200 च्या वर

इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजेच एमएफएन दर्जा काढून घेतलाय. यामुळे पाकिस्तानमधील बाजारपेठांमध्ये हाहाःकार उडालाय. याचा तातडीने परिणाम जाणवला नसला, तरी या परिणामांची भीषणता पाकिस्तानची जनता अनुभवत आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये निर्यात बंद केल्यामुळे पाकिस्तानच्या बाजारात मिरचीचा दर 400 रुपये प्रति किलो झालाय, तर टोमॅटोही 200 रुपये प्रति किलोच्या वर गेला आहे.

भारतामधून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला निर्यात होत होता. पण पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय शेतकऱ्यांनी पाकिस्तानला माल न पाठवण्याचा निर्णय घेतला. परिणामी पाकिस्तानला याचा मोठा फटका बसलाय. विशेष म्हणजे पाकिस्तानचे व्यापारी माल पुरवून पुरवून विकत आहेत. त्यामुळे स्टॉक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पाकिस्तान सरकारने कारवाई सुरु केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा 1996 ला दिलेला एमएफएन दर्जा काढून घेतला आणि सर्व प्रकारच्या आयातीवर 200 टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली. यामुळे पाकिस्तानच्या वस्तू भारतात येणंही अवघड होऊन बसलंय. शिवाय भारताने तर अगोदरपासूनच वस्तू पाठवणं बंद केलं होतं.

भारताने टोमॅटो पाठवणं बंद केल्यामुळे पाकिस्तानमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये हाहाःकार उडालाय. गेल्या वर्षी टोमॅटोचा दर 24 रुपये प्रति किलो होता. सध्या टोमॅटो 200 रुपये प्रति किलोने मिळत आहे. काही दुकानांमधून टोमॅटो जवळपास गायब झालाय.

मिरचीही चांगलीच तिखट झाली आहे. पाकिस्तानमध्ये मिरचीला मोठी मागणी आहे. प्रत्येक भाजीसाठी मिरचीची गरज असते. पण भारतीय मिरची पाकिस्तानला जाणं बंद झाल्यामुळे मिरचीचे दर 400 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. भाजीपाला मार्केटमधून मिरची पूर्णपणे गायब झाल्याचं बोललं जातंय.

पाकिस्तान सरकारने मिरची आणि टोमॅटोसाठी एक दर निश्चित केलाय. जे व्यापारी नियमांचं उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. शिवाय भाजीपाल्याचा स्टॉक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाई होत आहे. पाकिस्तानमध्ये मिरची आणि टोमॅटोचा पुरवठा भारताव्यतिरिक्त सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातून होतो. पण या भागातल्या पिकाचं पावसामुळे नुकसान झालंय, ज्याचा परिणाम पाकिस्तानच्या बाजारात पाहायला मिळतोय.

Published On - 8:22 pm, Sat, 16 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI