मी भारतात राहतो, भारतात कर भरतो, नागरिकत्वावरुन वाद का? अक्षय कुमार

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन पहिल्यांदाच जाहीर स्पष्टीकरण दिलंय. अक्षय कुमारने मतदान न केल्यामुळे त्याच्या देशप्रेमावरच शंका व्यक्त करण्यात आली. पण मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचं कधीही लपवलं नाही, मग आत्ताच हा सर्व वाद का काढला जातोय, असा सवाल अक्षय कुमारने केलाय. शिवाय मी देशासाठी माझ्या वतीने योगदान देत […]

मी भारतात राहतो, भारतात कर भरतो, नागरिकत्वावरुन वाद का? अक्षय कुमार
Follow us on

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन पहिल्यांदाच जाहीर स्पष्टीकरण दिलंय. अक्षय कुमारने मतदान न केल्यामुळे त्याच्या देशप्रेमावरच शंका व्यक्त करण्यात आली. पण मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचं कधीही लपवलं नाही, मग आत्ताच हा सर्व वाद का काढला जातोय, असा सवाल अक्षय कुमारने केलाय. शिवाय मी देशासाठी माझ्या वतीने योगदान देत राहिल, असंही अक्षय कुमारने म्हटलंय.

अक्षय कुमारचं स्पष्टीकरण

“माझ्या नागरिकत्वाबाबत अनावश्यक आणि नकारात्मक गोष्टी का पसरवल्या जात आहेत हे मला समजत नाही. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी गेल्या सात वर्षात कधीही लपवलेलं नाही किंवा नकारही दिलेला नाही. त्याचप्रमाणे मी गेल्या सात वर्षात कधीही कॅनडाला गेलेलो नाही हे देखील तेवढंच खरं आहे. मी भारतात काम करतो आणि सर्व प्रकारचे करही भारतातच भरतो. या गेल्या काही वर्षांमध्ये माझं देशाविषयीचं प्रेम सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर कधीही आलेली नाही. पण गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा मध्ये ओढला जातोय हे पाहून दुःख होतंय. हा मुद्दा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय आणि इतरांशी काहीही संबंध नसलेला आहे. माझा भारत आणखी मजबूत बनवण्यासाठी मी कायम योगदान देत राहिन एवढंच सांगतो,” असं स्पष्टीकरण अक्षय कुमारने दिलंय.

नागरिकत्वाबाबत तरतुदी

विविध वृत्तांमध्ये अक्षय कुमार हा भारताचा नागरिक नसल्याचं म्हटलं होतं. पण जॉली एलएलबी 2 या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अक्षय कुमारला पत्रकाराने नागरिकत्वाबाबात प्रश्न विचारला होता. यावर अक्षय कुमार म्हणाला, “हे तुम्ही समजताय तसं नाही. हे नागरिकत्व मानद (honorary) आहे.”

भारतीय राज्यघटनेनुसार भारतामध्ये कुणालाही दुहेरी नागरिकत्व ठेवता येत नाही. एखाद्या भारतीय व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यास त्याचं भारतातील नागरिकत्व आपोआप रद्द केलं जातं. याबाबतची तरतूद राज्यघटनेतील कलम 8 आणि नागरिकत्व कायदा 1955 च्या कलम 8 मध्येही आहे. भारतीय नागरिक नसणाऱ्या व्यक्तीला (Overseas Citizenship of India) मतदानाचा अधिकार नाही, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, खासदार, आमदार, सरकारी सेवा यासाठी अपात्र ग्राह्य धरलं जातं.

अक्षय कुमार नेमका कोणत्या देशाचा नागरिक?

मानद नागरिकत्व (Honorary Citizenship) हे एखाद्या देशाकडून सन्मान म्हणून दिलं जातं. मानद नागरिकत्व दिलं म्हणजे सामान्य नागरिकत्वाचे अधिकार मिळत नाहीत. म्हणजेच एखादा व्यक्ती कॅनडाचा Honorary Citizenship असेल तर त्यालाही कॅनडात जाण्यासाठी व्हिजा आवश्यक असेल.

अकॅडमन डॉट इन या वेबसाईनुसार, अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर केंद्रीय गृहमंत्रालयाने यापूर्वीच आरटीआयला उत्तर दिलेलं आहे. अक्षय कुमार हा Overseas Citizenship of India आहे की भारतीय नागरिक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो Overseas Citizenship of India नसल्याचं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ऑगस्ट 2017 मध्ये आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं, की अक्षय कुमार हा भारतीय नागरिक आहे.