क्वारंटाईन सेंटरला दिलेलं सामान परतलंच नाही; टीव्ही, 4 हजार गाद्या आणि 8 हजार बेड गायब

| Updated on: Jan 12, 2021 | 4:04 PM

औरंगाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेले 1 कोटी रुपयांचे सामान गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ( Aurangabad quarantine centre equipment lost)

क्वारंटाईन सेंटरला दिलेलं सामान परतलंच नाही; टीव्ही, 4 हजार गाद्या आणि 8 हजार बेड गायब
Follow us on

औरंगाबाद : क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी ठेवलेले तब्बल 1 कोटी रुपयांचे  सामान गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्वारंटाईन सेंटरमधून टीव्ही, फ्रिज, रेडिओ अशा प्रकारचे सामान गायब झाले आहे. गायब झालेल्या सामानामध्ये फ्रिज, टीव्ही, संगणक, फॅनचा समावेश आहे. (in Aurangabad equipment worth of rupees 1 crore has been lost from quarantine centre)

संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना जागोजागी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले होते. औरंगाबादेतसुद्धा कोरोनाला थोपवण्यासाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या उपायोजना केल्या गेल्या. यावेळी शहरात जागोजागी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले. शाळा, कॉलेज, सार्वजनिक इमारती यांना खाली करुन तेथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले. यावेळी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून औरंगाबाद पालिकेने क्वारंटाईन सेंटर्सना टीव्ही, फ्रिज, रेडिओ, गाद्या, उशा असं सगळं काही पुरवलं होतं. आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्यासुद्धा कमी झालीये. त्यामुळे आता शहरातील बहुतांश क्वारंटाईन सेंटर्स रिकामे झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या काही वसतीगृहातसुद्धा कोरोना संशयितांना ठेवले होते. यातीलच एका वसतीगृहातील तब्बल 1 कोटी रुपयांचे सामान गायब झाले आहे. या वसतीगृहाला पुरवलेले टीव्ही, फ्रिज, रेडीओ, गाद्या, उशा, असं सगळं काही गायब आहे.

4 हजार गाद्या, 86 फॅन गायब

या वसतीगृहात एकूण 4 हजार गाद्या, 4 हजार किट, 8 हजार बेडशीट, 10 टीव्ही, 6 फ्रीज, 6 संगणक आणि 86 फॅन गायब झाले आहेत. हे साहित्य औरंगाबाद महापालिकेने पुरवले होते. मात्र ते महापालिकेच्या मुख्यालयात परत जमाच झालेलं नाही. या सामानाची किंमत तब्बल 1 कोटी असल्याचे सांगितलं जात आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यातही हे सामान महापालिकेचे असल्यामुळे प्रशासन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गायब झालेले सामान नेमके कुठे गेले?, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे फ्रिजपासून ते संगणकांपर्यंत सामानाचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

(in Aurangabad equipment worth of rupees 1 crore has been lost from quarantine centre)