9 दिवसांनंतर बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले

| Updated on: Jun 11, 2019 | 9:27 PM

भारतीय वायू दलाच्या शोध मोहिमेत बेपत्ता एएन-32 विमानाचे काही अवशेष सापडले आहेत. अरुणाचल प्रदेशमधील लिपोच्या उत्तरेत हे अवशेष सापडले. विमानाच्या उर्वरित अवशेषांसाठी शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

9 दिवसांनंतर बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय वायू दलाच्या शोध मोहिमेत बेपत्ता एएन-32 विमानाचे काही अवशेष सापडले आहेत. अरुणाचल प्रदेशमधील लिपोच्या उत्तरेत हे अवशेष सापडले. विमानाच्या उर्वरित अवशेषांसाठी शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. हे विमान 3 जून रोजी आसामच्या जोरहाटमधून निघाले होते. मात्र निश्चित ठिकाणी पोहचण्याच्या आधीच ते बेपत्ता झाले. विमानात एकूण 13 जण होते.

एमआय 17 हेलिकॉप्टरने बेपत्ता विमानाचे अवशेष शोधले आहेत. हे अवशेष सियांग जिल्ह्यातील पयूममध्ये सापडले, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेले विमानाचे अवशेष बेपत्ता एएन-32 या मालवाहू विमानाचे आहे का याची शहानिशा करत आहे. हे अवशेष लिपोपासून 16 किलोमीटर उत्तरेला जमिनीपासून 12 हजार फूट उंचीवर मिळाले.

खराब हवामान असतानाही भारतीय वायू दल एएन-32 विमानाचा शोध व्यापक स्तरावर घेत आहे. विमानात अरुणाचल प्रदेशचे 13 लोक होते. मागील बुधवारी वायू दलाने या विमानाच्या शोधासाठी एसयू-30 जेट लढाऊ विमान, सी130 जेट, एमआय17 आणि एएलएच हेलिकॉप्टरांना मोहिमेवर पाठवले होते. तसेच इस्रोच्या मदतीने उपग्रह छायाचित्रांचाही आधार घेतला जात आहे. जंगल भागात विमानाच्या शोधासाठी भारतीय सैन्य, भारत-तिबेट सीमा पोलीस, अरुणाचल पोलीस आणि स्थानिक समुहांचीही मदत घेतली जात आहे.